अवकाश म्हणजे अथांग. ज्याच्या लांबी, रुंदी, उंचीचा कुणालाही थांगपत्ता लागत नाही. या अवकाशाबद्दलचं कुतूहल जगभरातल्या सगळ्याच लोकांना आहे. अनेक वर्षांपासून अवकाशाचं रहस्य शोधण्याचा प्रयत्न हजारो लोकांकडून रॉकेट, कृत्रिम उपग्रह अशा विविध साधनांनी, प्रयोगांनी केला जात आहे. त्यात एका वयाने छोट्या पण बुद्धीने तीक्ष्ण मुलाची भर पडली आहे. चीनचा ११ वर्षांचा मुलगा रॉकेटनिर्मितीद्वारे अवकाशाचे गूढ उकलवू पाहत आहे. लोक त्याचं कौतुक करत आहेत.
त्याचं नाव आहे यांग होंग सेन. तो चीनमधील झेजियांग शहरात राहतो. त्याला आकाशात झेपावणारे रॉकेट, त्याचे विज्ञान याची आवड आहे. एवढ्या लहान वयात त्याने रॉकेट लॉन्च करण्यासाठी लागणारे कोडं स्वतः तयार करून स्वत:चे रॉकेट आकाशात सोडण्यासाठी सज्ज केले आहे. या कामगिरीसाठी त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. रॉकेटमध्ये त्याला आवड निर्माण झाली ती चीनने जेव्हा प्रतिष्ठित ‘लाँग मार्च २ लिफ्टोफ’ आकाशात सोडले तेव्हा. तेव्हा यान चार वर्षांचा होता. त्याने रॉकेटचे प्रक्षेपण जवळून पाहिले. त्याक्षणी तो रॉकेटच्या प्रेमात पडला. एवढ्या लहान वयात त्याचा सखोल अभ्यास करू लागला. आता यान ११ वर्षांचा आहे. रॉकेटच्या उभारणीसाठी ६०० लाइन कोड लिहून त्याने जगभरातील लोकांना त्याची दखल घ्यायला लावली आहे.
वयाच्या चौथ्या वर्षांपासून तो याचा अभ्यास करत होता. या विषयाचे त्याने ऑनलाइन कोर्सेस केले आहेत. भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राचा त्याने स्टडी मटेरिअलच्या मदतीने सखोल अभ्यास केला आहे. २०२२मध्ये त्याने सलग दहा महिने राबून त्याच्या घरी त्याचे स्वतःचे सॉलिड फ्यूएल रॉकेट तयार केले. त्यानंतर त्याने २०२३ मध्ये सेन झिंग नावाचे रॉकेट लॉन्च केले. दुर्दैवाने ते छोट्या बिघाडामुळे क्रॅश झाले. या घटनेनंतर यान शांत राहिला व असे का झाले याचा शोध घेऊ लागला.
आता तो त्याचे दुसरे रॉकेट प्रक्षेपित करण्याचे नियोजन करतो आहे. हे चीनमधील सर्वोत्कृष्ट रॉकेट असेल अशी त्याला आशा आहे. हे यश चीनच्या प्रतिष्ठेत भर घालेल असा त्याला विश्वास आहे. जगभर ज्याचा डंका असेल असे रॉकेट बनविणे हे यानचे स्वप्न आहे. तो समाजमाध्यमांवर रॉकेटबांधणीचे टप्पे, त्याचा अभ्यास, निरीक्षण या सगळ्या गोष्टी सविस्तरपणे टाकत असतो. त्याला चार लाख लोक फॉलो करत आहेत. त्याच्या पालकांना यानच्या या गोष्टीचा अभिमान वाटतो. ते त्याला प्रोत्साहन देतात. मदत करतात. त्यांनी त्याचा दिवाणखाना त्याला रॉकेट रिसर्च स्टुडिओमध्ये बदलवून अभ्यासासाठी खुला करून दिला आहे. वडिलांना त्याची अभ्यासूवृत्ती खूप आवडते.
यानचे वडील म्हणतात, जरी त्याने बनविलेले एक रॉकेट अपयशी ठरले तरी तो त्याचा पहिला प्रयत्न होता, त्यामुळे त्यात अपयश आले तरी हरकत नाही. तो त्यातून शिकेल. ते पुढे म्हणतात, माझा मुलगा शांत असतो, काय चुकलं, काय बरोबर याचा विचार करत असतो. मला अवकाशातलं काही समजत नाही; पण माझा मुलगा जे काही करू इच्छितो, त्याला माझा पाठिंबा आहे. पालक म्हणून मला त्याच्या जिद्दीचं कौतुक वाटतं, अभिमान वाटतो. त्याला काही तांत्रिक अडचणी आल्या तर त्या तो सोडवू शकतो. तो मला सांगतो आणि माझा सल्ला घेतो. मला त्यातलं काही कळत नसलं तरी मला पण तशीच शक्यता वाटते का, हे तो आजमावून पाहत असतो.
यानने केलेल्या अभ्यासाचं या क्षेत्रातल्या जाणकारांना खूप कौतुक वाटतं. त्याच्या या अवकाशप्रेमाच्या गोष्टी संपूर्ण चीनमध्ये पसरल्या आहेत. लोक त्याच्या प्रयत्नांची दखल घेत असतात, तो काय करतो आहे ते बघत असतात, जाणून घेत असतात. यानच्या पालकांबद्दलही लोकांना फार कौतुक आहे. आपल्या मुलाला त्यांनी कसं घडविलं, याबद्दल त्यांना अपार कुतूहल आहे.
खरोखरचे रॉकेट तयार करायचेय ! यानला केवळ अवकाश अभ्यासाचीच आवड आहे असं नाही, तर तो त्याच्या शालेय अभ्यासातदेखील अव्वल आहे. शाळेत सर्व विषयांच्या परीक्षेत तो सर्वांत जास्त मार्क मिळवत आला आहे. शाळेच्या अभ्यासाबरोबर त्याला अवकाशविश्वाची गोडी लागली. चीनमधील सर्वांत प्रतिष्ठित सिव्हिलियन डिफेन्स युनिव्हर्सिटीत प्रवेश मिळणं, तेथे शिकायला मिळणं हे त्याचं स्वप्न आहे. या विद्यापीठात खरोखरचे रॉकेट आपल्या हातून तयार व्हावे आणि ते अवकाशात झेपावले जावे, ते देशाची शान ठरावे ही त्याची आकांक्षा आहे. त्यासाठी तो दिवसरात्र मेहनत घेत आहे.