सौदी अरेबिया हा देश सध्या अनेक कारणांनी कायम चर्चेत असतो. आपल्या देशाला प्रगत देशांच्या रांगेत नेऊन बसवण्याचा चंग गेल्या काही वर्षांपासून सौदी सरकारनं बांधला आहे. याच कारणानं आपल्या देशात अनेक सुधारणा घडवून आणण्याचा सपाटा या देशानं चालवला आहे. प्रतिगामी देश ही आपली प्रतिमा पुसून टाकण्यासाठी आणि संपूर्ण जगात उभरता देश ही आपली प्रतिमा दृढ करण्याची एकही संधी त्यामुळेच सौदी सध्या सोडत नाहीए. महिलांच्या संदर्भातले अनेक पुरोगामी निर्णय त्यांनी अलीकडे घेतले. त्यामुळे जगभरात त्यांचं कौतुकही होत आहे.
सौदी अरेबिया सध्या चर्चेत आहे तो शिक्षण क्षेत्रात त्यांनी राबवलेल्या आणि राबवत असलेल्या नवनवीन धोरणांमुळे. देशातील एकही व्यक्ती शिक्षणाविना राहू नये आणि आपला देश शंभर टक्के साक्षर असावा, या दृष्टीनं त्यांनी आता पावलं टाकायला सुरुवात केली आहे. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून सौदीत अनेक जण; ज्यांनी आपलं शिक्षण कधीच सोडून दिलं आहे किंवा जे शिक्षणाच्या बाहेर आहेत, त्यांनाही पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणले जात आहे. यासंदर्भात सरकार प्रोत्साहन देत असल्याने अनेक बुजुर्ग स्वत:हून शिक्षणाकडे परतले आहेत. याच यादीत एक नाव आहे ते म्हणजे नावदा अल कहतानी. या आजींनी आपलं अधुरं राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुन्हा शाळेत नाव नोंदवलं आहे आणि मोठ्या उत्साहानं त्या अक्षरांची बाराखडी गिरवत आहेत. या आजींचं वय किती असावं? - त्यांनी आपल्या वयाची शंभरी कधीच ओलांडली असून सध्या त्या तब्बल ११० वर्षांच्या आहेत आणि अगदी ठणठणीतही! या आजींना चार मुलं असून सगळ्यात मोठा मुलगा आहे ८० वर्षांचा, तर सगळ्यांत लहान मुलगा आहे ५० वर्षांचा!
या आजींचं वैशिष्ट्य म्हणजे शाळेची त्यांना खूपच आवड आहे आणि त्या रोज न चुकता शाळेत जातात. त्यांचा साठ वर्षांचा मुलगा त्यांना शाळेत सोडायला जातो आणि शाळा सुटेपर्यंत तो तिथेच बसून राहतो. शाळा सुटली की आपल्या आईला तो घरी घेऊन येतो. शाळा सुरू झाल्यापासून, शाळेत जायला लागल्यापासून नावदा आजींनी एक दिवसही शाळा चुकवलेली नाही. आपली आई पुन्हा शाळेत जातेय, शिकतेय याचं तिच्या चारही मुलांना खूपच कौतुक आहे. आजीबाईंची शिकण्याची ही अफाट उर्मी पाहून लोकही आश्चर्यचकित झाले आहेत; पण खुद्द आजीबाई स्वत:च यामुळे खूप खूश आणि आनंदी आहेत.
आजीबाई म्हणतात, सिखने की कोई उम्र नहीं होती. बस इतना सच है की देर आये, दुरुस्त आये! रोज शाळेत मी अतिशय मनापासून शिकते. त्यात मला खूप मजा येतेय. शाळेतून मला रोज होमवर्क मिळतो. दुसऱ्या दिवशी परत शाळेत जाताना हा होमवर्क मी पूर्ण केलेला असतो! माझ्या टिचर त्याबद्दल माझं कौतुकही करतात. सौदीचे क्राउन प्रिन्स पंतप्रधान मोहम्मद बिन सलमान यांनी २०३० पर्यंत देशाला विकसित देशांच्या पंक्तीत नेऊन बसवण्याचा जणू पणच केला आहे. त्या दृष्टीनं त्यांनी अनेक उपाययोजना केल्या आहेत. शिक्षणाच्या संदर्भातही त्यासाठी देशाच्या प्रत्येक भागात वेगवेगळे प्रयोग आणि प्रयत्न सुरू आहेत. आजींचा साठ वर्षांचा मुलगा मोहम्मद; जो आपल्या आईला रोज शाळेत सोडतो आणि घेऊन येतो, त्याचं म्हणणं आहे, आमच्या आईचं आम्हाला नुसतं कौतुकच नाही, तर प्रचंड अभिमान आहे. या वयात ती रोज शाळेत जाते. विशेष म्हणजे, ज्या जिद्दीनं आणि उत्साहानं ती आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटतेय, त्यासाठी तिला शाळेत नेणं-आणणं तर मी करूच शकतो. सौदी सरकारनं विशेषत: बुजुर्ग लोकांच्या शिक्षणासाठी, ज्यांचं शिक्षण मध्येच अर्धवट सुटलं आहे किंवा जे कधी शाळेतच गेले नाहीत, त्यांच्यासाठी ठिकठिकाणी ‘अल रहवा सेंटर’ उघडले आहेत. सध्या या सेंटर्समध्ये हजारो ज्येष्ठ नागरिक शिक्षण घेताहेत.
फार काही उशीर झालेला नाही!जवळपास शंभर वर्षांनी पुन्हा शाळेत परतणाऱ्या नावदा आजी म्हणतात, मी लहान असताना फार कमी काळ मला शाळेत जाता आलं. शाळेचं वातावरण पुन्हा अनुभवताना माझी हरवलेली सारी स्वप्नं आता पुन्हा माझ्या डोळ्यांत तरळू लागली आहेत; पण या वयात पुन्हा शाळेत जाणं ही सोपी गोष्ट नाहीच; पण माझ्यातली जिद्द आणि माझ्या स्वप्नांनीच मला पुन्हा शाळेकडे ओढून आणलं. माझ्या आयुष्याची उभरती वर्षं मी शाळेविना घालवली, याचं मला खरंच खूप दु:ख आहे. माझी शाळा मी कित्येक वर्षांपूर्वीच सुरू करायला हवी होती; पण ठीक आहे, अजूनही खूप उशीर झालेला नाही!..