ऑनलाइन लोकमत
कोलंबो, दि. 27 - श्रीलंकेत आलेल्या पुराने अक्षरक्ष: हाहाकार माचवला असून या महापुरात आतापर्यंत 120 जणांनी आपला जीव गमावला असून कित्येकजण बेपत्ता झाले आहेत. 2003 नंतर पहिल्यांदाच श्रीलंकेत पुरामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. भारताने तत्परतेने श्रीलंकेला मदत पाठवत नौदलाचे तीन जहाज रवाना केले आहेत. भारताने पाठवलेली मेडिकल आणि आपातकालीन टीम श्रीलंकेत पोहोचली आहे. भारताने पाठवलेलं "किर्च" शनिवारी कोलंबोत दाखल झालं. या जहाजातून औषध साहित्य पाठवण्यात आलं आहे.
सखल भागात पाणी भरण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने चेतावणी दिली आहे. श्रीलंकेतील परिस्थिती खूपच बिघडली असून भारताने देवदूताप्रमाणे धाव घेत मदतीला सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुरात मृत्यूमुखी पडलेल्यांसाठी शोक व्यक्त केला आहे. ट्विटमध्ये त्यांनी लिहिलं आहे की, "गरज पडल्यास आम्ही श्रीलंकेतील आमच्या बहिण भावांसोबत उभे राहू".
मुसळधार पाऊस आणि त्यानंतर आलेला पूर व भूस्खलनाने श्रीलंकेत 119 जणांचा बळी घेतला आहे. देशातील 20 हजार नागरिकांना या पुराचा फटका बसला आहे. गुरुवार व शुक्रवार मिळून देशात 300 ते 500 मिमी पाऊस झाला. काही भागात तर 600 मिमी पावसाची नोंद झाली आहे. श्रीलंकेचे हवाई दल आणि नौदलाचे जवान पुरात अडकलेल्या नागरिकांना हेलिकॉप्टर आणि बोटींच्या माध्यमातून मदत करीत आहेत. 2003 रोजी पावसाने व भूस्खलनाने देशातील दक्षिण भागात 250 नागरिकांचा बळी घेतला होता.
श्रीलंकेत आलेल्या रेकॉर्डब्रेक पावसामुळे पश्चिम आणि दक्षिण भागात पूर आला आहे. पुराने गेल्या 14 वर्षांचा रेकॉर्ड तोडला आहे. बचावकार्यादरम्यान श्रीलंका नौदलाच्या एका जवानाचा हेलिकॉप्टरमधून पडून मृत्यू झाला. परिस्थिती अशीच राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.