ठळक मुद्देसिटी रेकॉर्डनुसार या इमारतीमध्ये लिफ्टची सोय नव्हती.या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आग लागली, त्यानंतर ती इतर मजल्यांवर पसरत गेली.
न्यू यॉर्क- ब्रोनॉक्स येथील इमारतीमध्ये लागलेल्या आगीमध्ये 12 जणांचा मृत्यू झाल्याची त्याचप्रमाणे 4 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती न्यू यॉर्कचे महापौर बिल दे ब्लासिओ यांनी दिली आहे. आगीमुळे मृत्यू झालेल्यांमध्ये एक वर्ष वयाच्या बालकाचाही समावेश असल्याचे महापौरांनी सांगितले आहे. तसेच गंभीर जखमींपैकी आणखी काही जणांना आपण गमावण्याची शक्यता आहे अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.
या आगीमध्ये मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या आप्तेष्टांप्रती आणि अजूनही मृत्यूशी लढा देत असलेल्या प्रत्येक जखमीप्रती माझी सहानुभूती आहे अशा भावना आग्निशमन आयुक्त डॅनियल निग्रो यांनी सांगितले. ही आग इमारतीच्या पहिल्या मजल्यावर लागली आणि नंतर इतर मजल्यांवर पसरत गेली. वेगवेगळ्या मजल्यांवरील लोक आगीमध्ये मृत्युमुखी पडले आहेत असे सांगून मृतांमध्ये एक वर्षाच्या बालकापासून 50 वर्षे वयापर्यंतच्या लोकांचा समावेश आहे असे निग्रो यांनी सांगितले. या आगीतून लोकांना वाचवण्यासाठी अग्निशमन दलाचे 160 जवान प्रयत्न करत होते अशी माहितीही त्यांनी दिली. सिटी रेकॉर्डनुसार या इमारतीमध्ये लिफ्टची सोय नव्हती. 2007 मध्येही ब्रोनोक्समध्ये याच प्रकारची आग लागली होती तेव्हा 9 लाहन मुलांची व एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता.