प्लॅटफॉर्मवरील बनावट खाती वाढल्यामुळे ट्विटरने नुकत्याच जाहीर केलेल्या ब्लू टिकसाठी आठ डॉलर शुल्क आकारण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली; परंतु, स्थगितीचा हा निर्णय येईपर्यंत अमेरिकेच्या एका मोठ्या फार्मास्युटिकल कंपनीचे तब्बल १५ अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले. त्याचे झाले असे की, कुणीतरी आठ डॉलर देऊन एली लिली या इन्सुलिन बनवणाऱ्या कंपनीच्या नावाचे ब्लू टिक मिळवले. त्यानंतर गुरुवारी त्या फेक अकाउंटने ‘आम्ही घोषणा करतो की इन्सुलिन आता मोफत मिळेल’ असे ट्वीट केले. हे ट्वीट एली लिली कंपनीनेच केल्याचा अनेकांचा समज झाला आणि बाजारात एकच खळबळ उडाली. एली लिलीचे शेअर्स शुक्रवारी ४.३७ टक्क्यांनी घसरले. परिणामी, कंपनीचे बाजार भांडवल मूल्यदेखील तब्बल १५ अब्ज डॉलरने (सुमारे १,२०० अब्ज रुपये) कमी झाले. कोणतेही नियोजन नसताना ब्लू टिक व्हेरिफिकेशनद्वारे पैसे कमवण्याच्या इलॉन मस्कच्या एका निर्णयामुळे एली लिलीचे अब्जावधींचे नुकसान झाले. यावरून नेटकऱ्यांनी इलॉन मस्कला चांगलेच फैलावर घेतले आहे.
फक्त एका फेक ट्वीटमुळे १,२०० अब्ज रुपयांचा फटका!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2022 9:13 AM