ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. २१ - साधारणत: कुठल्याही स्त्रीच्या प्रसुतीला नऊ महिन्यांचा कालावधी लागतो. पण इंग्लंडमध्ये एका महिलेने १८ महिन्यात १३ मुलांना जन्म दिला आहे. तुम्ही म्हणाल हे कसे शक्य आहे ? वास्तवात हे शक्य नाही पण इंग्लंडमध्ये एका महिलेने हजारो पाऊंडस कमावण्यासाठी कागदोपत्री बनावट मुले दाखवून ९.५८ लाख रुपयांचा प्रशासनाला गंडा घातला.
रेबेका जॉन्स असे या महिलेचे नाव आहे. मॅंचेस्टरमध्ये रहाणा-या या महिलेने दोन मुलांसाठी टॅक्स क्रेडिटसचा दावा केला होता. त्यानंतर तिने अतिरिक्त लाभ मिळवण्यासाठी १३ मुले दाखवली. पहिल्या ३४ दिवसात तिने सात मुलांना हजर करुन पैसे उकळले. मुलांच्या बनावट नावाने तिन बँकेमध्ये खाती उघडली.
रेबेकाला वास्तवात दोन मुले आहेत. पण नंतर तिने बनावट मुलांना जन्म दिल्याचे दाखवले. रेबेकाने जी मुले दाखवली त्यात तीन जुळी मुले होती. मुलांच्या जन्मतिथीमधला घोळ लक्षात आल्यानंतर हा घोटाळा उघड झाला. रेबेकाला शिक्षेसाठी मॅंचेस्टर क्राऊन कोर्टात १५ एप्रिलला पाठवले जाईल.