ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. २५ - इंग्लंडची राणी क्वीन एलिझाबेथने तिच्या तरुणपणी लिहीलेल्या प्रेमपत्राचा नुकताच लिलाव झाला. तब्बल १४ हजार पाऊंड म्हणजे साडेतेरा लाख रुपयांना या पत्राची विक्री झाली. अपेक्षित रक्कमेपेक्षा १८ पट जास्त किंमत या पत्राला मिळाली. या दोन पानी पत्रात क्वीनने प्रिन्स फिलीप यांच्यासोबतच्या प्रेमसंबंधांचे वर्णन लिहीले आहे.
१९४७ साली प्रिन्स फिलीप यांच्यबरोबर विवाहाच्या काही महिने आधी क्वीन एलिझाबेथने हे पत्र लिहीले होते. त्यावेळी त्या २१ वर्षांच्या होत्या. प्रिन्सची आणि त्यांची कशी ओळख झाली, फोटो ग्राफरनी त्यांचा कसा पाठलाग केला तसेच लंडनच्या नाईट क्लबमध्ये केलेला डान्स याचे वर्णन या पत्रात आहे.
लिलावापूर्वी आठशे ते जास्तीत जास्त बाराशे पाऊंड मिळतील असा अंदाज होता. पण प्रत्यक्षात १४ हजार पाऊंड मिळाले. ऑनलाइन आणि फोनवरुन लिलावाची प्रकिया पार पडली. राणीचे प्रेमपत्र विकत घेणा-या खरेदीदाराचे नाव गुप्त ठेवण्यात आले आहे.
लेखक बेटी श्यू यांनी रॉयल वेडिंगची स्मरणिका लिहीली. त्यासाठी एलिझाबेथ यांनी आपले हे प्रेमपत्र दिले होते. वयाच्या १३ व्या वर्षी त्यांची पहिल्यांदा प्रिन्स फिलीप यांच्याबरोबर ओळख झाली होती. प्रिन्सला फास्ट कारचे वेड असल्याचे एलिझाबेथ यांनी पत्रात म्हटले आहे.