- परकीय प्रभावाविरोधात लढा : बुरखे विकणारी १६० दुकाने बंद
ऑनलाइन लोकमत
दुशांबे, दि.२१ - परदेशातून येणा-या मूलतत्वविचारसरणींना थोपविण्यासाठी ताजिकिस्तानच्या निधर्मी सरकारने अत्यंत कडक पावले उचलली आहेत. शेजारील अफगाणिस्तानातील अशा विचारसरणींचा प्रभाव टाळण्यासाठी ताजिक सरकार सक्रिय झाले आहे. ताजिकिस्तानच्या पोलिसांनी याचाच एक भाग म्हणून १३ हजार लोकांना दाढी उतरवण्यासाठी राजी केले आहे तर बुरखे विकणारी १६० दुकानेही पोलिसांनी बंद केली आहेत.
ताजिकिस्तान हा मध्य आशियातील एक देश असून त्याच्या शेजारी अफगाणिस्तान, उझबेकीस्तान, कझाखस्तान, किरगिझीस्तान, चीनचा उइघुर प्रांत आहे. त्यामुळे मुलतत्ववादी विचारसरणी आपल्या देशामध्ये शेजारील देशातून आयात केली जाऊ नये यासाठी येथील सरकार पावले उचलत आहे. त्यामुळेच दाढी, बुरखे असे संकेत पाळण्यास सरकार विरोध करत असून नागरिकांना तसे न करण्यासाठी समजावत आहे. नैऋत्य खातलॉन प्रांताच्या पोलिसांचे प्रमुख बाहरोम शरिफजोदा यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी १७०० मुली व स्त्रियांना बुरखा न वापरण्यासाठी समजावले आहे. ताजिकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने मागच्या वर्षीच देशातील एकमेव नोंदणीकृत इस्लामी पक्ष इस्लामिक रेनेसाँ पार्टीवर बंदी आणली आहे.