ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 18 - सातत्याने होत असलेल्या तापमान वाढीने जगभरातील हवामान तज्ज्ञ चिंतित असतानाच सरलेल्या सप्टेंबर महिन्याने त्यांच्या चिंतेत अधिकच भर टाकली आहे. सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा अधिक तापमान नोंदवण्यात आल्याने यंदाचा सप्टेंबर महिना गेल्या 136 वर्षातील सर्वात हॉट सप्टेंबर ठरला आहे.
नासाच्या अहवालामधून ही धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. तसेच गेल्या 12 महिन्यांपैकी 11 महिन्यांमध्ये तापमान वाढ नोंदवण्यात आल्याची माहिती या अहवालातून देण्यात आली आहे. नासाच्या गोडार्ड इन्स्टिट्युट स्पेस स्टडी (GISS) च्या शास्रज्ञांनी जागतिक तापमानाच्या केलेल्या विश्लेषणातून या सप्टेंबर महिन्यात तापमानामध्ये 0.004 डिग्री सेल्शियसने वाढ झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे यंदाचा सप्टेंबर महिना सर्वाधिक उष्ण ठरला आहे. याआधी 2014 च्या सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक तापमान नोंदवण्यात आले होते. सप्टेंबर 2016 आणि सप्टेंबर 2014 या दोन महिन्यांतील तापमानामध्ये मोठा फरक दिसून आलेला नाही. मात्र 1951 ते 1980 या वर्षांमध्ये सप्टेंबर महिन्यात नोंदवण्यात आलेल्या तापमानान्या तुलनेत यंदाच्या सप्टेंबरमधील तापमानात 0.91 डिग्री एवढी वाढ नोंदवण्यात आली आहे.