नवी दिल्ली – मुस्लीम बहुल देश इंडोनेशियात १४ मुस्लीम मुलींचं मुंडण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या मुलींना योग्यरित्या हिजाब घातला नव्हता असा त्यांच्यावर आरोप आहे. इंडोनेशियातील एका शाळेतील ही घटना आहे जिथे मुलींवर चुकीच्या पद्धतीने हिजाब घातल्याचं म्हटलं जाते. या मुलींना शिक्षा म्हणून त्यांचे मुंडण करण्यात आले आहे. सोमवारी शाळेच्या हेडमास्टरने या प्रकाराची माहिती दिली.
रिपोर्टनुसार, २७ कोटी लोकसंख्या असलेल्या इंडोनेशियात मुस्लीम आणि गैर मुस्लीम मुलींना हिजाब घालण्याचे बंधन आहे. २०२१ मध्ये इंडोनेशियात धार्मिक ड्रेसकोडवर निर्बंध लागू केले होते. परंतु आजही येथील अनेक भागात मुलींना ड्रेस कोड फॉलो करण्यासाठी मजबूर केले जाते. मुलींचे मुंडण करण्याचा प्रकार पूर्वी जावाच्या लामोंगन शहरातील सरकारी ज्यूनिअर हायस्कूलमध्ये घडला. बुधवारी एका शिक्षकाने १४ मुलींनी हिजाब नीट परिधान केला नव्हता अशी तक्रार दिली होती.
या तक्रारीनंतर शिक्षकाच्या सांगण्यावरून सर्व १४ मुलींचे केस कापण्यात आले. या घटनेनंतर शाळा प्रशासनाने माफी मागितली आहे आणि संबंधित शिक्षकाला निलंबित केले आहे. ज्या मुलींचे केस कापण्यात आले त्यांनी हिजाबमध्ये डोक्यावर घालणारी टोपी घातली नव्हती. ज्यामुळे त्यांचे केस दिसत होते. त्यामुळे शिक्षकाने इतकी क्रूर शिक्षा दिली. या घटनेनंतर शाळेने मुलींच्या पालकांची माफी मागितली आणि मध्यस्थी करत हा वाद मिटवण्यात आला. मात्र या घटनेने मुलींच्या मानसिकतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
मानवाधिकार संघटनेचे कार्यकर्ते संतापले
या प्रकाराची माहिती मिळताच मानवाधिकार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शिक्षकाची हकालपट्टी करण्याची मागणी केली. लमोंगनमधील हे प्रकरण कदाचित इंडोनेशियातील आतापर्यंत सर्वात भयंकर घटना आहे. कुठल्याही शिक्षकाला मुलींचे केस कापण्याचा अधिकार नाही. या शिक्षकावर कारवाई व्हायला हवी अशी मागणी ह्यूमन राईट्स वॉचचे इंडोनेशियातील रिसर्चर एंड्रियास हरसोनो यांनी केली आहे.
इंडोनेशियात ६ प्रमुख धर्मांना मान्यता देण्यात आली आहे. परंतु मुस्लीम बहुल देशात धार्मिक दहशत वाढतच चालली आहे. २०२१ मध्ये एका शाळेतील इसाई धर्मातील विद्यार्थिनींना हिजाब घालण्यासाठी दबाव आणला गेला. वारंवार सांगूनही मुलीने हिजाब घातला नाही म्हणून तिच्या आई वडिलांना शाळेने बोलावले. त्यानंतर पालकांशी चर्चा करताना गुप्त व्हिडिओ बनवण्यात आला. त्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल केला. स्कूलच्या नियमानुसार, सर्व मुस्लीम-गैर मुस्लीम मुलींनी हिजाब घालणे बंधनकारक आहे असं शाळेचे अधिकारी व्हिडिओत म्हणताना दिसत होते.