बांगलादेशच्या (Bangladesh) पंतप्रधान शेख हसीना (Prime Minister Sheikh Hasina) यांच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपाखाली (attempt to kill PM Sheikh Hasina) १४ दहशतवाद्यांना हत्येची शिक्षा सुनाविण्यात आली आहे. बांगलादेशच्या कोर्टानं आज यासंदर्भातील निकाल दिला आहे. जुलै २००० साली एका निवडणुक प्रचाराच्या रॅली दरम्यान पंतप्रधान शेख हसीना यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. ढाका येथील कोर्टाचे न्यायाधीश अबू जफर मोहम्मद कमरूज्जमां यांनी याप्रकरणात अटक करण्यात आलेल्या १४ आरोपींना कठोर शिक्षा देण्याची गरज असल्याचं मत व्यक्त करत फाशीची शिक्षा जाहीर केली आहे.
"देशाच्या सर्वोच्च पदाच्या व्यक्तीचा हत्येचा कट रचणाच्या गंभीर गुन्ह्यात समाजापुढे याचं उदाहरण तयार व्हावं यासाठी आरोपींना कठोर शिक्षा देणं गरजेचं आहे. त्यामुळे आरोपींच्या फाशीच्या शिक्षेवर तात्काळ कार्यवाही करावी आणि कोणत्याही कायद्याच्या सहाय्यानं शिक्षेवर स्थगिती आणली जाऊ नये", असं रोखठोक विधान न्यायाधीश अबू जफर यांनी केलं आहे.
खटल्याच्या सुनावणीवेळी एकूण आरोपींपैकी ९ आरोपींना कोर्टात हजर करण्यात आलं होतं. सर्व दोषी हे बंदी घालण्यात आलेल्या हरकत-उल-जिहाद बांगलादेश या संघटनेचे सदस्य आहेत. तर इतर पाच आरोपी फरार आहेत. तरीही त्यांच्या अनुपस्थितीतच कोर्टानं दोषींना शिक्षा सुनावली आहे.
निवडणूक रॅली दरम्यान रचला हत्येचा कटहरकत-उल-जिहाद बांगलादेशच्या दहशतवाद्यांनी २१ जुलै २००० साली दक्षिण-पश्चिम गोपाळगंज येथील कोटलीपाडा येथे एका मैदानाजवळ तब्बल ७६ किलो वजनाचा बॉम्ब लावला होता. याच ठिकाणी पंतप्रधान शेख हसीना यांची निवडणूक प्रचारसभा होणार होती. या कटात सामील असणारे आणखी काही जण अजूनही फरार आहेत. दरम्यान, फरार असणारे आरोपी सुरक्षा संस्थेच्या हाती लागल्यानंतर त्यांना फाशीची शिक्षा दिली जावी, असं कोर्टानं नमूद केलं आहे. सुरक्षा यंत्रणांनी निवडणूक प्रचारसभा होण्याआधीच स्फोटकं शोधून काढली होती. त्यानंतर काही दिवसांनी प्रचारसभेच्या जवळच एका ठिकाणी आणखी ४० किलो स्फोटकं ताब्यात घेण्यात आली होती.