गुआम, दि. 11 - उत्तर कोरिया आणि अमेरिकेमध्ये तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. उत्तरकोरियाने अमेरिकेच्या गुआम बेटाला लक्ष्य करण्याची धमकी दिली आहे. उद्या उत्तर कोरियाने क्षेपणास्त्रे डागलीच तर, फक्त 14 मिनिटात ही क्षेपणास्त्रे गुआममध्ये विध्वंस घडवतील. या क्षेपणास्त्रांना अमेरिकन भूमीपर्यंत पोहोचायला फक्त 14 मिनिटे लागतील असे या बेटाच्या महिला सुरक्षा प्रवक्त्याने सांगितले.
युद्धाचा प्रसंग उदभवल्यास फक्त 15 मिनिटात अलर्ट वॉर्निंग सिस्टिम, सायरनच्या मदतीने लगेच नागरीकांना सर्तक केले जाईल असे या बेटाच्या महिला सुरक्षा प्रवक्त्याने जीन्ना गामींडे यांनी पत्रकारपरिषदेत सांगितले. दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरियाला निर्वाणीचा इशारा दिला आहे. उत्तर कोरियाने अमेरिका किंवा आमच्या मित्र राष्ट्रांवर हल्ला केला तर, उत्तरकोरियाने कल्पनाही केली नसेल अशा गोष्टी त्यांच्या बाबतीत घडतील.
गुआमवर हल्ल्याची आपली पूर्ण योजना तयार असल्याने उत्तरकोरियाने गुरुवारी जाहीर केला. गुआम बेटावर अमेरिकेचे 7 हजार सैनिक तैनात आहेत. लष्कराकडून आम्हाला हल्ल्याची माहिती दिली जाईल. आम्ही सर्व माध्यमांचा वापर करुन लवकरात लवकर लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवू. स्थानिक माध्यम, महापौर आणि सोशल मीडियाचा प्रभावी वापर करु असे जीन्ना गामींडे यांनी सांगितले. तुम्ही सायरन ऐकला तर, पुढच्या सूचनांसाठी लगेच रेडिओ, टीव्ही सुरु करा असे महिला प्रवक्याने सांगितले. उत्तरकोरियातल्या लोकांनी अमेरिकेविरोधात विरोध प्रदर्शन केलं आहे. तसेच उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग ऊन यांना जाहीर समर्थन दिलं आहे. जर आमच्या हुकूमशाहानं आदेश दिला, तर अमेरिकेवर अणुबॉम्ब टाकू, असं उत्तर कोरियाच्या जनतेनं म्हटलं आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरियाला दिलेल्या धमकीनंतर जनतेनं हे विरोध प्रदर्शन केलं आहे. तर दुसरीकडे ट्रम्प पहिल्यापासूनच उत्तर कोरियाला धमकी देत आले आहेत. मात्र यावेळी त्यांनी दिलेली ही शेवटची धमकी समजली जातेय. ट्रम्प म्हणाले होते, उत्तर कोरियानं अमेरिकेला धमकावणं सुरूच ठेवलं, तर जगात कुठल्याही देशाचा झाला नाही, उत्तर कोरियाचा असा विध्वंस करू. ट्रम्प यांच्या या विधानानंतर उत्तर कोरियाच्या जनतेनं अमेरिकेच्या विरोधात प्रदर्शन केलं आहे.