दक्षिण अमेरिकन देश गयाना येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणी एका विद्यार्थिनीने आपल्या शाळेच्या वसतिगृहाला आग लावली. या आगीत वसतिगृह जळून खाक झाले. मुलीच्या या कृत्यामुळे केवळ वसतिगृहच जळून खाक झाले नाही, तर शाळेत शिकणाऱ्या मुली आणि कर्मचाऱ्यांसह एकूण 20 जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोक पसरला आहे. या अल्पवयीन विद्यार्थिनीचे वय अवघे 14 वर्षे आहे.
डेली स्टारमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, गयाना येथील एका शाळेच्या मुलींच्या वसतिगृहात सोमवारी रात्री आग लागली. काही क्षणातच आगीने वसतिगृहाच्या मोठ्या भागाला वेढले. या भीषण आगीत अनेक विद्यार्थिनी आणि कर्मचारी अडकले होते. अग्निशमन दलाला तातडीने पाचारण करण्यात आले, मात्र आग नियंत्रण मिळेपर्यंत 20 जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ज्या मुलीने वसतिगृहाला आग लावली ती देखील या घटनेत गंभीर जखमी झाली आहे.
दरम्यान, या संपूर्ण घटनेचे कारण मोबाईल आहे. विद्यार्थिनीने शाळेत आपला मोबाईल सोबत आणला होता. त्यावेळी विद्यार्थिनीचा मोबाईल शिक्षकाने जप्त केला होता. यामुळे विद्यार्थिनी संतापली. त्यानंतर तिने ही संतापजनक घटना घडवली. या घटनेत जखमी झालेल्या विद्यार्थ्यावर उपचार सुरू आहेत. याशिवाय, इतर 9 जणांवरही उपचार सुरू आहेत. तसेच, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मृत्युमुखी पडलेल्या मुलांपैकी बहुतांश 12 ते 18 वर्षे वयोगटातील असल्याचे सांगितले जात आहे.