कोपनहेगन: डेन्मार्क देशात 'ग्राइंड' नावाची जुनी परंपरा पार पाडण्यासाठी 1400 हून अधिक डॉल्फिन्सची निर्दयीपणे कत्तल करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर जगभरातून संताप व्यक्त करण्यात येतोय. प्राण्यांचे संरक्षण करणाऱ्या विविध संस्थांनी या शेकडो डॉल्फिन्सचा समुद्रात मृतावस्थेत पडलेला व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत समुद्राचे पाणी रक्तानं लाल झाल्याचं दिसत आहे.
निर्दयपणे केली शिकार
अॅनिमल वेल्फेअर ग्रुप शी शेफर्डने 12 सप्टेंबर रोजी डॉल्फिन शिकारीचे फोटो शेअर केले. डॉल्फिन्सची शिकार करण्यासाठी त्यांना आधी उथळ पाण्याकडे नेलं आणि तिथं लोकांनी चाकू भोसकून निर्दयीपणे त्यांची हत्या केली. या शेकडो कत्तलीमुळे समुद्राचं पाणी लाल झालं होतं.
काय आहे 'ग्राइंड' परंपरा?ग्राइंड हा पारंपारिक सोहळा असून, शेकडो वर्षांपूर्वी याची सुरुवात झाली होती. या सोहळ्यात शिकार केली जाते आणि हा कार्यक्रम कायदेशीररित्या वैध आहे. दरवर्षी उन्हाळ्यात या सोहळ्याचे आयोजन केलं जातं. या सोहळ्या अंतर्गत समुद्रातील प्राण्यांची शिकार केली जाते.