अफगाणिस्तानच्या बदख्शान प्रांतात माजी उपराज्यपाल यांच्या अंत्यसंस्काराजवळ गुरुवारी झालेल्या स्फोटात १५ जण ठार आणि ५० जण जखमी झाले. प्रांताच्या माहिती आणि संस्कृती विभागाचे प्रमुख मजुद्दीन अहमदी यांनी टोलो न्यूजला सांगितले की, बदख्शान प्रांताची राजधानी फैजाबाद येथील मशिदीत हा स्फोट झाला. स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार, फैजाबादमधील हेसा-ए-अवल भागातील नबावी मशिदीत हा स्फोट झाला. संस्कृती विभागाच्या प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेतील मृतांचा खरा आकडा अद्याप समजू शकलेला नाही. टोलो न्यूजने रुग्णालयातील एका सूत्राच्या हवाल्याने सांगितले की, १५ मृतदेह रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत. यासोबतच ५० जखमींवर उपचार सुरू आहेत. वृत्तानुसार, हा आत्मघाती हल्ला होता. या स्फोटानंतर परिसरात भीतीचे वातावरण परसले आहे.
माजी कमांडर सफिउल्ला समीम यांचा मृत्यूमाजी उपराज्यपाल निसार अहमद अहमदी यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी झालेल्या स्फोटात बागलानचे माजी पोलीस कमांडर सफिउल्लाह समीम यांचाही मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती हमीद करझाई यांनी ट्विटच्या माध्यमातून बदख्शान प्रांताची राजधानी फैजाबादच्या हेसा-ए अवल भागातील नबावी मशिदीवरील हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. पीडितांच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त केला. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने देखील या हल्ल्याचा निषेध केला आहे.