ऑनलाइन लोकमत -
इस्लामाबाद, दि. १६ - पाकिस्तानातील पेशावरमध्ये सरकारी कर्मचा-यांना घेऊन जाणा-या बसमध्ये बॉम्बस्फोट झाला आहे. या बॉम्बस्फोटात 15 जणांचा मृत्यू झाला असून 30 जण जखमी झाले आहेत. बसमध्येच ठेवण्यात आलेल्या बॉम्बचा स्फोट घडवून हा हल्ला करण्यात आला.
बस कर्मचा-यांनी घेऊन सुनेहरी मशीद रोडवर पोहोचली असताना हा बॉम्बस्फोट झाला. बसमध्ये स्फोट झाला तेव्हा बसमध्ये 50 कर्मचारी उपस्थित होते. मृतांमध्ये एक महिला आणि लहान मुलाचादेखील समावेश आहे.बसमध्ये आईडी बॉम्ब ठेवण्यात आला होता. 8 किलोहून जास्त स्फोटक बसमध्ये ठेवण्यात आले होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
जखमींना लेडी रिडींग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची परिस्थिती गंभीर असून आठ जणांना आयसीयुमध्ये दाखल करण्यात आले आहे.पोलिसांनी सर्व परिसरात नाकाबंदी केली असून सर्च ऑपरेशनला सुरुवात केली आहे.