मॉस्को : रशियातील डोंगराळ भागात असलेल्या एका शाळेत विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी झाली. या हाणामारीदरम्यान चाकू हल्ला करण्यात आला. यामध्ये जवळपास 15 जण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, उरल या डोंगराळ भागातील पर्म येथील शाळेतील दोन विद्यार्थांमध्ये भांडण झाले. यादरम्यान दोघांनी एकमेकांवर चाकू हल्ला केला. यावेळी त्या दोघांचे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या बाकीच्या विद्यार्थ्यांवर आणि शिक्षकांवर सुद्धा या दोघांनी चाकू हल्ला केला. यात जवळपास 15 जण जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या 15 जणांपैकी 12 जणांना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेत एक शिक्षिका आणि दोन 15 वर्षीय विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. तर बाकीचे किरकोळ जखमी झाले आहेत. दरम्यान, चौकशी समितीने ही घटना दोघांची किंवा अन्य व्यक्तींची हत्या करण्याच्या उद्देशाने करण्यात आली असल्याची शक्यता वर्तविली आहे. तसेच, याप्रकरणी शाळेतील इतर विद्यार्थ्यांची सुद्धा चौकशी करण्यात येणार असल्याचे संबधित चौकशी समितीने म्हटले आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातल्या एका आश्रमशाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या हाणामारीमध्ये एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. विशेष म्हणजे ही हाणामारी झोपेच्या जागेवरून झालेल्या वादातून झाली होती. येथील करवीर तालुक्यातील रजपूतवाडी येथील माध्यमिक आश्रमशाळा आहे. या आश्रमशाळेमध्ये जवळपास 70 मुले शिक्षण घेत आहेत आणि विद्यार्थ्यांमध्ये झोपण्याच्या जागेवरून काल रात्री वाद झाला आणि त्याच पर्यावसान हाणामारीमध्ये झाले होते. या हाणामारीमध्ये शंकर झोरे या सोळा वर्षीय वयाच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. शंकर झोरे हा मूळचा शाहूवाडी तालुक्यातील आंबाईवडा या गावातील आहे. गेल्या दोन वर्षांपासून तो या माध्यमिक आश्रम शाळेमध्ये राहत होता.