युक्रेन-रशिया यांच्यात सुरु असलेल्या युद्धाला आज 28 दिवस झाले आहेत. रशियाचे आतापर्यंत किती नुकसान झाले आहे, यासंदर्भात युक्रेनने आकडेवारी जाहीर केली आहे. ट्विटद्वारे याबाबत माहिती देताना युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, आतापर्यंत 15,600 रशियन सैनिक मारले गेले आहेत. तर 1008 सशस्त्र वाहने, 4 जहाजे, 47 अँटी एयरक्राफ्ट वॉरफेयर सिस्टम्स, 101 विमाने, 124 हेलिकॉप्टर्स, 517 टँक, 42 यूएव्ही आणि 15 विशेष उपकरणे नष्ट करण्यात आली आहेत.
क्रेमलिनचे प्रवक्ते Dmitry Peskov यांनी मोठे वक्तव्य केले आहे. जर रशियासमोर अस्तित्वाचा धोका निर्माण झाला तर तो केवळ अण्वस्त्रांचा वापर करेल, असे Dmitry Peskov यांनी म्हटले आहे. दरम्यान, रशियन सैन्याने कीवच्या ओबोलोनमध्ये गोळीबार केला, ज्यामुळे दोन इमारती आणि एक ट्रकला आग लागली. जवळपास दोन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात आली. मारियुपोलमधील परिस्थितीही चिंताजनक आहे.
स्थानिक अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बचावकार्य सुरू असतानाच मारियुपोल शहरावर बॉम्ब फेकण्यात आले. रशियाच्या लष्कराकडून युक्रेनवर हल्ले सुरूच आहेत. जवळपास एक महिन्यापूर्वी रशियन आक्रमण सुरू झाल्यापासून मारियुपोल शहर सतत आगीखाली आहे. युक्रेनमध्ये सध्या भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे.
एका स्थानिक अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीचा हवाला देऊन ह्युमन राइट्स वॉचने सांगितले की, 200,000 हून अधिक लोक मोक्याच्या शहरात अडकले आहेत. 22 मार्च रोजी मारियुपोलमधून 1,200 हून अधिक रहिवाशांना बाहेर काढण्यात आले. उपपंतप्रधान इरिना वीरेशचुक यांच्या म्हणण्यानुसार, 15 बसेसच्या मदतीने लोकांना रशियन सैन्याने वेढा घातलेल्या मारियुपोल बंदरातून झापोरिझ्झ्या येथे सुरक्षितपणे नेण्यात आले.
रशियाकडून 'फॉस्फरस बॉम्ब'चा वापरदुसरीकडे, रशियाने युद्धादरम्यान फॉस्फरस बॉम्बचा वापर केल्याचा दावा युक्रेनकडून करण्यात आला आहे. फॉस्फरस बॉम्ब म्हणजे नेमके काय? हे जाणून घेऊया...फॉस्फरस हा रंगहीन रसायनाचा एक प्रकार आहे. ऑक्सिजनच्या संपर्कात आल्याने फॉस्फरस पेट घेतं. पांढरा फॉस्फरस हा मेणासारखा मऊ तंतुमय पदार्थ दिसतो. फॉस्फरसचा वास काहीसा लसणासारखा असतो. प्रकाशात राहिल्यावर या रसायनाचा रंग हळूहळू पिवळा होत जाताना दिसतो. फॉस्फरसचा वापर युद्धादरम्यान स्फोटकं आणि धुराच्या आवरण तयार करण्यासाठी केला जातो. पिवळा फॉस्फरस अत्यंत विषारी असून त्याचा धूरही अत्यंत घातक ठरतो. पेट घेतलेल्या पांढऱ्या फॉस्फरसचे तापमान 800 डिग्री सेल्सियसपेक्षाही जास्त असते. या बॉम्बच्या स्फोटामुळे निर्माण झालेले लाखो कण पांढर्या धुराप्रमाणे सर्वत्र पसरले जातात. फॉस्फरस बॉम्बच्या संपर्कात आल्यानंतर कोणत्याही व्यक्तीचा तत्काळ मृत्यू संभावतो. याचे घातक कण हे मानवी शरीरात प्रवेश करतात. याबाबतची माहिती एका हिंदी वेबसाईटने दिले आहे.