मॉस्को - रशियाने अमेरिका व युरोपीय देशांच्या 150 राजनैतिक अधिका-यांची हकालपट्टी केली असून, सेंटपीटर्सबर्गमधील अमेरिकेचा दूतावासही बंद करण्यात येणार आहे. ब्रिटनमधील रशियाचा माजी गुप्तहेर स्क्रिपल व अजून दोघांवर नर्व्ह एजंटचा जीवघेणा प्रयोग करण्यात आला.यामागे रशियाचा हात असल्याचा आरोप करून ब्रिटन व काही युरोपीय देश तसेच अमेरिकेने रशियाच्या 150 राजनैतिक अधिका-यांची नुकतीच हकालपट्टी केली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून रशिया ही तितक्याच राजनैतिक अधिका-यांची हकालपट्टी करणार असून, त्यात अमेरिकेच्या साठ राजनैतिक अधिका-यांचा समावेश आहे. त्यांना 5 एप्रिलपर्यंत रशियातून निघून जाण्यास सांगण्यात आले आहे. तर गेल्या काही दिवसांपूर्वी अमेरिकेनंही रशियाच्या 60 राजनैतिक अधिका-यांची हकालपट्टी केली होती. अमेरिकेतल्या ट्रम्प प्रशासनानं काही दिवसांपूर्वी 60 राजनैतिक अधिका-यांची हकालपट्टी केली होती. तसेच अमेरिकेनं रशियाचं सिएटल येथील दूतावास बंद करण्याचे आदेशही दिले होते. अमेरिका आणि युरोपियन देशांनी रशियाला धडा शिकवण्यासाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल उचललं होतं. ब्रिटनच्या गुप्तहेराला विष देण्याच्या प्रकरणात रशियाचाही हात असल्याचा युरोपियन महासंघाचा आरोप होता. त्यामुळेच अमेरिकेनं 60 राजनैतिक अधिका-यांना निलंबित करत रशियाचं सिएटल येथील दूतावासही बंद करण्याचे आदेश दिले होते.