जेरुसलेम : इस्रायली लष्कराने दक्षिण लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या ठिकाणांवर मोठा हवाई हल्ला केला आहे. इस्रायल डिफेन्स फोर्सेसने (IDF) केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये हिजबुल्लाह मुख्यालय, शस्त्रास्त्रे साठवण्याची सुविधा आणि रॉकेट लाँचर्ससह १५० हून अधिक दहशतवादी पायाभूत सुविधा उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत.
या इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मोठ्या प्रमाणात हिजबुल्लाहचे दहशतवादीही मारले गेले आहेत. मात्र, त्यांच्या संख्येबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. इराणने १ ऑक्टोबर रोजी तेल अवीववर केलेल्या हल्ल्यानंतर आज इस्रायलने हिजबुल्लाहवर हा हल्ला केला आहे. तसेच, इस्रायलने इराणला सुद्धा प्रत्युत्तर देण्याचा निर्णय घेतला आहे.
आयएएफच्या सहकार्याने आमच्या सैन्याने सीमेजवळील दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. तसेच हिजबुल्लाहच्या पायाभूत सुविधा उद्ध्वस्त केला आहेत, असे इस्रायली लष्कराने सांगितले. हिजबुल्लाचे मुख्यालय आणि इतर पायाभूत सुविधा नष्ट झाल्या आहेत. यामध्ये हिजबुल्लाहचे रॉकेट लाँचर्स, स्फोटकांचे भंडार आणि इस्त्रायली सैन्याने शोधून नष्ट केलेली अतिरिक्त लष्करी उपकरणे यांचा समावेश आहे, असेही इस्रायली लष्कराने सांगितले.
दरम्यान, इराणच्या लष्कराने मंगळवारी रात्री इस्रायलवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा केला. या हल्ल्यात प्रामुख्याने लष्करी आणि सुरक्षा आस्थापनांना लक्ष्य करण्यात आले आहे. त्यामुळे तणाव आणखी वाढला आहे. आता इस्रायल सुद्धा इराणवर हल्ला करण्याच्या तयारीत आहे. तसेच, इराणच्या हल्ल्यानंतरही इस्रायली सैन्याने लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या ठिकाणांवर हल्ले करणे सुरूच ठेवले आहे. इस्त्रायली लष्करही जमिनीवर कारवाई करत आहे, ज्यामध्ये हिजबुल्लाह दहशतवाद्यांचा शोध घेऊन त्यांचा खात्मा केला जात आहे.