वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रवासी बंदी निर्णयाच्या निषेधार्थ देशात विरोध होत असताना आता १६ अॅटर्नी जनरल यांनी एकजूट दाखवत याविरुद्ध आवाज उठविला आहे. मुस्लिमबहुल सात देशांच्या नागरिकांना अमेरिकेत प्रवेश बंदीचा निर्णय ट्रम्प यांनी घेतलेला आहे. हा निर्णय भेदभावाचा आणि घटनाबाह्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे. इराण, इराक, लिबिया, सोमालिया, सूदान, सीरिया आणि यमन या सात देशांच्या नागरिकांना अमेरिकेत प्रवेशावर बंदी घालण्यात आली होती. ट्रम्प यांनी या शासकीय आदेशावर स्वाक्षरीही केली. पण, सिएटलच्या एका न्यायालयाने या आदेशाच्या अंमलबजावणीवर अस्थायी स्वरूपात स्थगिती आणली आहे. ट्रम्प प्रशासनाने या निर्णयाला सर्किट कोर्ट आॅफ अपिल्समध्ये आव्हान दिले आहे. तर, १६ राज्यांच्या अॅटर्नी जनरल यांनी या शासकीय आदेशाच्या विरुद्ध न्यायमित्रांची बाजू दाखल केली आहे. पेनसिल्व्हेनियाचे अॅटर्नी जनरल जोश शापिरो म्हणाले की, ही याचिका आमच्या समुदायाला सुरक्षित ठेवण्यासाठी, अर्थव्यवस्थेचे संरक्षण करण्यासाठी आणि कायद्याचे शासन कायम ठेवण्यासाठी आहे. तर, मेसाच्युसेट्सच्या अॅटर्नी जनरल श्रीमती माउरा हेले म्हणाल्या की, कोणतेही अध्यक्ष वा प्रशासन आमच्या कायद्यापेक्षा व घटनेपेक्षा शक्तिशाली नाहीत.राज्याचे अॅटर्नी जनरल असल्यामुळे आमचे हे कर्तव्य आहे की, आम्ही या प्रशासनाला अधिक जबाबदार बनवू. या प्रयत्नात आम्ही एकजूट आहोत. न्यूयॉर्कचे अॅटर्नी जनरल एरिक श्ेइनरमन यांनी या बंदीला घटनाबाह्य, बेकायदेशीर आणि गैरअमेरिकी असल्याचे म्हटले आहे. याबाबतचा सरकारी प्रस्ताव रद्द करण्याची मागणी न्यायमित्रांनी केली आहे. अॅटर्नी जनरल यांनी असे म्हटले आहे की, या आदेशामुळे देशातील विद्यापीठांचे मोठे नुकसान होत आहे. जे विद्यापीठे जगातील विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यावर अवलंबून आहेत त्यांचे मोठे नुकसान होत आहे. (वृत्तसंस्था)रशियाने व्यक्त केला संतापमॉस्को : अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलाखतीदरम्यान रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांना उद्देशून खुनी या शब्दाचा वापर केल्यामुळे रशियामध्ये संताप व्यक्त होत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांची मुलाखत काही दिवसांपूर्वी फॉक्स न्यूजवर प्रसारित करण्यात आली होती. त्यात फॉक्स न्यूजचे मुलाखतकर्त्याने पुतीन यांना खुनी म्हटले होते. त्यामुळे फॉक्स न्यूजने माफी मागावी, अशी मागणी रशियाने केली आहे. फॉक्स न्यूजचे मुलाखतकर्ते बिल ओ राइली यांनी ट्रम्प यांची मुलाखत घेताना, पुतीन यांचा उल्लेख खूनी ‘अ किलर’ असा केला होता. पुतीन यांचा उल्लेख खुनी असा करण्यामागे काय कारण होते, याचे स्पष्टीकरणही मुलाखतकर्त्यांने त्या वेळी दिले नव्हते. तुम्ही पुतीन यांचा आदर, सन्मान करतात का? असा प्रश्न राइली यांनी विचारला. त्यावर त्यावर ट्रम्प यांनी होकारार्थी उत्तर दिले. त्यानंतर, पुन्हा पुतीन हे खुनी आहेत, तरी तुम्ही त्यांचा आदर, सन्मान का करता? असा प्रश्न राइली यांनी विचारला. त्या प्रश्नाच्या उत्तरात ट्रम्प यांनी आपल्याकडेही (अमेरिका) बरेच खुनी आहेत. आपला देश निर्दोष आहे, असे तुम्हाला वाटते की काय? असा प्रतिसवाल ट्रम्प यांनी केला होता. फॉक्स न्यूजने वापरलेले शब्द अवमानकारक आहे. ही भाषा सहन केली जाणार नाही, असे रशियाने म्हटले आहे. प्रतिष्ठित मानली जाणारी फॉक्स न्यूज ही वृत्तवाहिनी माफी मागेल, अशी अपेक्षाही रशियाने व्यक्त केली आहे. (वृत्तसंस्था)
१६ अॅटर्नी जनरल्सचे ट्रम्पना आव्हान
By admin | Published: February 08, 2017 1:27 AM