बीजिंग : ‘कन्टेम्पोररी अॅम्पेरेक्स टेक्नॉलॉजी कं.लि.’ (सीएटीएल) या वाहनांच्या बॅटरीचे उत्पादन करणाऱ्या चीनमधील जगातील सर्वात मोठ्या कंपनीने इलेक्ट्रिक वाहनांसाठी १६ वर्षे व २० लाख कि.मी. पुरेल एवढ्या क्षमतेची पुन्हा-पुन्हा चार्ज करता येणारी बॅटरी विकसित केली आहे. आग्नेय चीनमधील निंगदे येथे कंपनीच्या मुख्यालयात एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ‘सीएटीएल’चे अध्यक्ष झेंग युक्युन यांनी सांगितले की, कोणी मागणी केल्यास अशी बॅटरी तयार करून देण्याची आमची तयारी आहे.
इलेक्ट्रिक वाहनांमध्ये सध्या वापरल्या जाणाºया बॅटरीहून ही नवी बॅटरी १० टक्के महाग असेल, असेही ते म्हणाले. सध्याच्या इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीला दीड लाख कि.मी. किंवा आठ वर्षे टिकण्याची वॉरन्टी असते. ‘सीएटीएल’ कंपनी टेस्ला, फोक्सव्हॅगन, बीएमडब्ल्यू व टोयोटा या कंपन्यांच्या इलेक्ट्रिक वाहनांमध्ये वापरल्या जाणाºया बॅटऱ्यांचे उत्पादन करते. टेस्ला व जनरल मोटर्स या कंपन्यांनी १० लाख कि.मी. पुरेल अशी बॅटरी बनविण्याची योजना जाहीर केली आहे. (वृत्तसंस्था)झेंग सांगतात ते खरे असेल, तर त्यांच्या कंपनीची बॅटरी याहून दुप्पट टिकाऊ असेल. इलेक्ट्रिक वाहनांमधील बॅटरी हाच सर्वात महाग व महत्त्वाचा भाग असतो; पण ही बॅटरी लवकर उतरणे व काही काळाने पूर्णपणे बदलावी लागणे या अडचणींमुळे लोक अजून इलेक्ट्रिक वाहनांकडे म्हणावे तेवढे वळलेले नाहीत; पण ‘सीएटीएल’ कंपनी म्हणते तशी १६ वर्षे पुन्हा-पुन्हा चार्ज करून वापरता येणारी बॅटरी खरंच प्रत्यक्षात आली, तर इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढविण्यात तो क्रांतिकारी टप्पा ठरेल.