सना, दि.11- आफ्रिकेतून येमेनच्या दिशेने जाणाऱ्या निर्वासितांना समुद्रात फेकण्याची 24 तासांच्या आत पुन्हा एकदा घटना घडली आहे. बोटीतून प्रवास करत आलेल्या 160 नागरिकांना पाण्यात ढकलल्याचे सांगण्यात येत असून त्यांच्यापैकी 6 जणांचे मृतदेह सापडल्याचे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ मायग्रेशनच्या (आयओएम) माहितीतून स्पष्ट झाले आहे. मृतांमध्ये दोन पुरुष व चार महिलांचा समावेश आहे. तसेच अजूनही 13 जण बेपत्ता असल्याचेही स्पष्ट झाले.
आयओएम येण्यापुर्वीच पाण्यातून वाहात आलेल्या 84 लोकांनी किनारा सोडला होता तर किनाऱ्यावर राहिलेल्या 57 जणांना आयओएमने अन्न आणि औषधे देण्याची मदत केली. गुरुवारी हे 160 इथिओपियन लोक अरबी समुद्रातून प्रवास करत होते. किनाऱ्यावर पोहोचण्यापुर्वीच मानवी तस्करांनी या लोकांना पाण्यात फेकून दिले. कालच मानवी तस्करांनी अशाच प्रकारे 50 लोकांना पाण्यात फेकून दिले होते. येमेनमध्ये अंतर्गत यादवी सुरु असल्यामुळे तस्करांना मदत करणाऱ्या शक्ती तेथे प्रबळ झाल्या आहेत. या घटनांवर आयओएमचे अध्यक्ष लेसी स्विंग यांनी दुःख व्यक्त केले आहे. 'अशा प्रकारे निर्दयीपणाने लोकांना पाण्यात फेकून देण्याच्या घटना घडत आहेत म्हणजे जगाच्या मूलभूत पायामध्येच काहीतरी चूकले आहे. इथिओपिया आणि येमेनमधील हॉर्न ऑफ आफ्रिका परिसरातील मार्ग अत्यंत व्यस्त आणि धोकादायक मार्ग आहे.'
मागच्या वर्षी 1 लाख 11,500 निर्वासित येमेनच्या किनाऱ्यावर उतरले तर त्याआधीच्या वर्षी एक लाख लोक आले होते. यावर्षी आतापर्यंत 55 हजार लोकांनी हॉर्न ऑफ आफ्रिकाजवळून येमेनच्या दिशेने प्रवास केला असून त्यामध्ये एक तृतियांश संख्या महिला आहेत. बुधवारी इथिओपिया आणि सोमालियामधील 50 व्यक्तींना घेऊन जाणाऱ्या लोकांच्या बोटीतील सर्व लोकांना तस्करांनी फेकून दिले होते. त्यातील 22 लोक अद्याप बेपत्ता आहेत. या प्रकारच्या घटनांमुळे संयुक्त राष्ट्राच्या विविध समित्यांनी चिंता व्यक्त केली आहे.
इथिओपियन, सोमालियन लोक का स्थलांतर करत आहेत ?2006 ते 2016 या दहा वर्षांच्या काळामध्ये सात लाख लोकांनी हॉर्न ऑफ आफ्रिकाजवळून प्रवास केला आहे. यामध्ये सर्वाधीक संख्या इथिओपियाच्या निर्वासितांची असून उरलेलेल लोक सोमालियाचे आहेत सोमालियातून आलेले निर्वासित येमेनमध्येच राहाणे पसंत करतात तर इथिओपियन लोक येमेनमधून युरोपच्या मार्गावर निघण्याचा प्रयत्न करतात. इथिओपिया आणि सोमालियामध्ये सध्या राजकीय स्थिती वाईट असली तरी या लोकांना येमेनमध्ये त्याहून वाईट प्रकारची यादवी सुरु असल्यामुळे धोका पत्करावा लागत आहे. इथिओपियामधील लोक तेथील आणीबाणीला कंटाळले आहेत तर सोमालियाचे लोक आदिवासी समुदायांमधील लढाया, सरकार आणि अल-शबाब संघटनेतील युद्ध, बेकारी, कुपोषणाला कंटाळून बाहेर पडत आहेत.