- १९,७०० मीटर उंचीवर फुलाचा आकृतिबंध
ओटावा : खाली डोके आणि वर पाय अशा स्थितीत ताशी २४० किमी वेगाने पृथ्वीकडे झेपावत असताना १६४ जिगरबाज स्काय डायव्हर्सच्या एका आंतरराष्ट्रीय चमूने हातात हात गुंफून एका मोठ्या फुलाच्या आकारात स्काय डायव्हिंग करून आकृतिबंध स्काय डायव्हिंगचा नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला.शरीर उभ्या स्थितीत ठेवून (व्हर्टिकल) सर्वाधिक संख्येच्या स्काय डायव्हर्सनी पृथीपासून सर्वाधिक उंचीवर आकृतिबंध तयार करण्याचा हा विक्रम शुक्रवारी मध्य इलिनॉय राज्याच्या आकाशात नोंदविण्यात आला. या विक्रमी चमूतील स्काय डायव्हर्स स्पेन, आॅस्ट्रेलिया व अमेरिकेच्या विविध राज्यांमधील प्रशिक्षण केंद्रातील होते. १३ व्या प्रयत्नांत त्यांना हे यश मिळाले. त्यांनी सन २०१२ मध्ये १३८ स्कायडायव्हर्सनी केलेला विक्रम मोडला.एकूण सात विमानांमधून या १६४ जणांनी भरारी घेतली. स्काय डायव्हर्सना सुयोग्य ठिकाणी, सुयोग्य वेळेला आणि सुयोग्य उंचीवर आकाशात उडी घेता यावी यासाठी ही विमाने अचूक वेगाने व दिशेने उडत गेली. ठरलेल्या अचूक वेळी या सर्व १६४ जणांनी आपापल्या विमानांमधून आकाशात उड्या घेतल्या आणि ओटावाच्या ग्रामीण ‘ड्रॉप झोन’च्या वर आकाशात १९,७०० फूट उंचीवर असताना सर्वांनी काही क्षणांसाठी एका महाकाय फुलाच्या आकाराचा आकृतिबंध तयार केला. त्यानंतर हे सर्व स्काय डायव्हर्स विखुरले गेले आणि पॅराशूट उघडून कालांतराने अलगदपणे जमिनीवर पोहोचले तेव्हा आनंदाने प्रेक्षकांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले.विशेष म्हणजे या विक्रमवीरांएवढेच तरबेज व्हिडिओग्राफरने स्काय डायव्हिंग करत त्यांच्या दोन्ही बाजूंना, वर आणि खाली राहून या थरारक क्षणांचे व्हिडिओ शूटिंग केले. शिकागो शहराच्या नैऋत्येस ८० किमी अंतरावर या साहसी खेळासाठी ‘स्काय डाईव्ह शिकागो’ हा ड्रॉप झोन व विमानतळ तयार करण्यात आला होता. तेथे ‘फेडरेशन एअरोनॉटिक इंटरनॅशनल’ या जागतिक हवाई क्रीडा महासंघाचे तीन पंच तेथे बसलेले होते. आकाशातील व्हिडिओग्राफरनी केलेले व्हिडिओ शूटिंग जमिनीवर बसलेल्या पंचांकडे थेट पाठविले जात होते. या आकृतिबंधात प्रत्येक स्काय डायव्हर त्याच्या पूर्वनिर्धारित स्थानावर आहे तसेच सर्वांचे हात एकमेकांत गुंफलेले आहेत याची खातरजमा करून घेतल्यानंतर पंचांनी हा नवा विक्रम झाल्याचे जाहीर केले.स्काय डायव्हिंग हा अत्यंत धोकादायक आणि चित्तथरारक क्रीडा प्रकार आहे. ‘डर के आरो जित है’ या उक्तीप्रमाणे एकदा का त्याची गोडी लागली की ती तुम्हाला स्वस्थ बसू देत नाही. याच अदम्य ओढीने फ्रान्स, ब्रिटन, दुबई आणि आॅस्ट्रेलियातील बहाद्दर सदस्य या चमूत सहभागी होण्यासाठी आले. एक जण तर हिंदी महासागरातील मादागास्करच्या किनाऱ्यालगत असलेल्या रियुनियन या छोट्याशा बेटावरून तीन दिवसांचा प्रवास करून शिकागोला आला होता. (वृत्तसंस्था)