दुबई : कंगाल पाकिस्तानात सध्या लोकांकडे दोन वेळचे पोटभर जेवण्यासाठी पैसे नाहीत आणि येथील हजारो लोकांनी दुबईत अलिशान घरे घेतली आहेत. दुबईतून एक पाकिस्तानात भुकंप आणणारी बातमी येत आहे. दुबईमध्ये जगभरातील लोकांनी खरेदी केलेल्या मालमत्तेची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये पाकिस्तानातील तब्बल १७००० राजकारणी, अब्जाधीशांचा समावेश आहे.
या पाकिस्तानी लोकांनी दुबईत तब्बल २३००० घरे घेतली असून या संपत्तीची एकूण किंमत ११ अब्ज डॉलर असल्याचे या अहवालात म्हटले आहे. या यादीमध्ये राजनैतीक अधिकारी, राजकीय व्यक्ती, जागतिक स्तरावर प्रतिबंधित असलेले लोक, अफरातफर करणारे आणि गुन्हेगार देखील आहेत. शोधपत्रकारिता प्रोजेक्ट 'दुबई अनलॉक्ड' असे ही माहिती बाहेर काढणाऱ्या रिपोर्टचे नाव आहे. महत्वाचे म्हणजे ही संपत्ती २०२०-२२ या काळात घेतलेली आहे. २०२२-२४ या काळातील माहिती अद्याप बाहेर आलेली नाही, त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
पाकिस्तानी नेत्यांची नावेही यात आहेत. राष्ट्रपति आसिफ अली झरदारी यांची तिन्ही मुले, हुसैन नवाज शरीफ, गृह मंत्री मोहसिन नकवी यांची पत्नी, चार खासदार आणि सिंध आणि बलुचिस्तानच्या विधानसभांतील अर्धा डझन आमदारांची नावे आहेत. परवेज मुशर्रफ, माजी पंतप्रधान शौकत अजीज तसेच डझनाहून अधिक सैन्याचे माजी जनरल, पोलीस प्रमुख, राजदूत आणि वैज्ञानिकांचीही नावे आहेत.
पाकिस्तानच्या ओमनी ग्रुप चे मुख्य वित्तीय अधिकारी असलम मसूद आणि त्यांच्या पत्नीकडेही दुबईत अनेक मालमत्ता आहेत. मनी लाँड्रिंगचा आरोप असलेले अमेरिकेने प्रतिबंधित केलेले अल्ताफ खनानी नेटवर्कच्याही अनेक मालमत्ता आहेत. रावळपिंडीचे कुख्यात डॉक्टर हामिद मुख्तार शाह यांचेही यात नाव आहे. या डॉक्टरने मजुर, गरीबांचे अपहरण करून त्यांच्या किडण्या काढून विकल्याचे आरोप आहेत. यामुळे या डॉक्टरवर अमेरिकेने प्रतिबंध लावलेले आहेत.