नवी दिल्ली: नायजेरियाच्या समुद्र किनाऱ्याजवळ एका जहाजाचं अपहरण करण्यात आलं आहे. हे जहाज हाँगकाँगचं असल्याची माहिती समोर येत असून त्या जहाजावर एकूण १८ भारतीय आहेत. समुद्रातील घडामोडींवर लक्ष ठेवणाऱ्या एका जागतिक एजन्सीनं याबद्दलची माहिती दिली आहे. व्हीएलसीसी नेव्ह कॉन्स्टेलेशन या जहाजाचं नायजेरियाजवळ समुद्री चाच्यांनी अपहरण केलं. याबद्दलची माहिती मिळताच भारतीय दूतावासानं नायजेरियन प्रशासनाशी संपर्क साधला. अपहृत जहाजावर एकूण १९ जण असून त्यातील १८ जण भारतीय आहेत, तर एक जण तुर्कस्तानचा रहिवासी आहे. समुद्रातील घडामोडींवर लक्ष ठेवून असणाऱ्या एआरएक्स मॅरिटाईमनं दिलेल्या माहितीनुसार, हाँगकाँगचा झेंडा असलेल्या व्हीएलसीसी नेव्ह कॉन्स्टेलेशन जहाजावर मंगळवारी (३ डिसेंबर) संध्याकाळी नायजेरियाच्या किनाऱ्याजवळ समुद्री चाच्यांनी हल्ला केला. याआधी २००८ मध्ये सोमालियाजवळ एडनच्या आखातात एक जहाज समुद्री चाच्यांनी ताब्यात घेतलं. त्यामध्ये १८ भारतीयांसह एकूण २२ प्रवासी होते.