बीजिंग : चीनच्या बाजारांमध्ये प्राण्यांपासून संक्रमित होणाऱ्या आजारांचे १८ नवे विषाणू आढळले आहेत. त्यांच्यामुळे माणसांना मोठा धोका आहे व आणखी साथी पसरण्याची शक्यता आहे असा इशारा संशोधकांनी दिला आहे. हा शोध अमेरिका, चीन, बेल्जियम, ऑस्ट्रेलिया या देशातील संशोधकांनी लावला आहे. प्राण्यांमध्ये असणारे हे नवे विषाणू माणसांमध्येही संक्रमित होऊन त्यामुळे नव्या आजाराची साथ केवळ चीनमध्येच नव्हे तर साऱ्या जगभर पसरू शकते. कोरोनाचे पहिले रुग्ण जिथे आढळले होते, त्या वुहान शहरातील प्राणी बाजार हा कोरोना विषाणूमुक्त असल्याचा दावा चीनने केला होता. वुहानमधून कोरोना साथीचा उगम झाला होता का याविषयी संशोधकांत मतभेद आहेत. मात्र, कोरोनाचा विषाणू प्राण्यातून माणसांत संक्रमित झाल्याबद्दल कोणाचेही दुमत नाही. वुहानच्या बाजारात प्राण्यांची कत्तल करून त्यांच्या मांसाची विक्री होते. असे बाजार चीन, भारत, आशियातील काही देशांत आढळतात.
विषाणूंपासून जपायला हवे- चीनमधील प्राणी बाजारांमध्ये सिवेट प्राण्यामध्ये काही धोकादायक विषाणू आढळून आले. वटवाघळात आढळणारा एचकेयू८ हा विषाणूही सिवेटमध्ये आढळला. त्यामुळे कोरोनासारखे आजार प्राण्यांमधून माणसांमध्ये संक्रमित होऊन त्यातून मोठ्या साथी पसरू शकतात हे चीनमध्ये केलेल्या संशोधनातून पुन्हा सिद्ध झाले.