जाकार्ता - बाईक रेसिंगमध्ये थरार पाहणे ही प्रेक्षकांसाठी पर्वणी असते. मात्र या शर्यतींमध्ये बायकर्सना आपल्या जीवावर उदार होऊन ट्रॅकवर उतरावे लागते. या शर्यतींमध्ये अपघात होणे तर नित्याचेच असते, असा अपघात झाल्यावर अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. असाच एक भयानक अपघात रविवारी इंडोनेशियामधील मंडालिका इंटरनॅशनल स्ट्रीट सर्किटवर झाला.
येथे इंडोनेशिया ग्रांप्रि पूर्वी वॉर्म-अप सुरू होते. त्याचदरम्यान स्पेनचा बाईक रेसर आणि सहावेळचा वर्ल्ड चॅम्पियन मार्क मार्क्वेजच्या दुचाकीचा भीषण अपघात झाला. त्यामुळे ही दुचाकी अनेक मीटर लांब जाऊन पडली.
आता त्याचा व्हिडीओही व्हायरल होत आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता की दुचाकीसोबत बाईक रेसरही फरफटत जाताना दिसत आहे. त्यानंतर तो स्वत: उठतो आणि रस्त्याच्या शेजारी जातो.मात्र या अपघातानंतर बाईक रेसर मार्क याला त्वरित जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याला दुखापतीमुळे इंडोनेशिया ग्रांप्रि स्पर्धेला मुकावे लागले.
ज्यावेळी हा अपघात झाला तेव्हा मार्क त्याची दुचाकी ट्रॅकवरून सुमारे १८० किमी प्रती तास वेगाने पळवत होता. मात्र ट्रॅकवर अचानक वळण आले आणि अपघातानंतर होंडा बाईक डाव्या दिशेला अनेक मीटर लांब जाऊन पडली. या अपघातात दुचाकी खिळखिळी झाली. मार्क होंडा टीमसाठी रेसिंग करतो. दरम्यान, तपासणीनंतर मार्क अद्यापही अनफिट आहे, तसेच त्याला काही दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे, असे टीमने सांगितले.