लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : दहशतवादाला खतपाणी घालून काही साध्य होणार नाही, हे पाकिस्तानने ओळखावे आणि १९७१ च्या युद्धात काय झाले होते याचे भान ठेवावे, असा इशारा सत्ताधारी ‘रालोआ’चे उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार एम. व्यंकय्या नायडू यांनी रविवारी येथे दिला. १९७१च्या युद्धात पाकिस्तानचा सपशेल पराभवच झाला नव्हता तर त्याचे दोन तुकडे होऊन स्वतंत्र बांगलादेश उदयास आला होता.सन १९९९ मधील पाकिस्तानसोबतच्या कारगिल युद्धात प्राणाहुती दिलेल्या वीरजवानांच्या स्मृत्यर्थ आयोदित ‘कारगिल पराक्रम परेड’नंतर नायडू बोलते होते.नायडू म्हणाले की, आमच्या शेजारी देशाने मागच्या अनुभवावरून शिकावे. दहशतवाद हा मानवतेचा शत्रू असल्याने त्याने कोणाचेच भले होत नाही. पण दुर्दैवाने पाकिस्तानने शासन व्यवहाराच्या धोरणाचा भाग म्हणून दहशतवादाचा वापर करीत आहे. पाकिस्तान काश्मीरमध्ये केवळ लुडबूडच करत नाही तर तेथे दहशतवादास सक्रियतेने पाठिंबा देत आहे, असाही त्यांनी आरोप केला.नायडू असेही म्हणाले की, भारत हा शांतताप्रिय देश आहे. भारताने कधीही कोणावर आक्रमण केलेले नाही, ही त्याची खासियत आहे. आम्हाला युद्ध, संघर्ष नको आहे. आम्हाला शांतता हवी आहे व शेजाऱ्यांशी चांगले संबंध ठेवायचे आहेत. पण शेजाऱ्यांनीही भ्रातृभाव दाखवावा, अशी आमची अपेक्षा आहे. येत्या महिनाभरात देशाच्या दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वोच्च घटनात्मक पदावर बसणार असलेल्या नायडू यांनी मंत्री असल्याप्रमाणे एवढी थेट व तिखट भाषा वापरावी, हे लक्षणीय आहे.काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे व पाकव्याप्त काश्मिरमधील इंचभरही जमीन कोणी भारतापासून हिरावून घेऊ शकणार नाही, याची पाकिस्तानने पक्की खुणगाठ बांधावी.- एम. व्यंकय्या नायडू
१९७१ च्या युद्धाचे पाकने भान ठेवावे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 12:55 AM