वॉशिंग्टन : अमेरिकी शिखांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर उसळलेल्या १९८४ च्या शीखविरोधी दंगलीतील पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्याकडे मदत मागितली आहे. ओबामांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, दंगलीसंदर्भातील गुन्ह्यांकरिता केवळ तीस जणांना दोषी ठरविण्यात आले; मात्र पक्षाचे प्रतिनिधी आणि सरकारला न्यायालयासमोर आणण्यात पोलीस यंत्रणेला अपयश आले. आंतरराष्ट्रीय धोरण निर्माण करणे व संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे कायम सदस्य बनण्याच्या शक्यतेच्या दृष्टिकोनातून भारताची महत्त्वपूर्ण भूमिका पाहता तुम्ही या दंगलीबाबत भारताशी चर्चा करावी, असे आम्हाला वाटते. इन्साफ, ह्यूमन राईट वाच आणि शीख कोएलिशनने संयुक्तरीत्या हे पत्र लिहिले आहे. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची ३१ आॅक्टोबर १९८४ रोजी त्यांच्या दोन अंगरक्षकांनी गोळ्या घालून हत्या केली होती. त्यानंतर सूडाच्या भावनेतून दिल्लीत शीख नागरिकांवर मोठ्या प्रमाणात हल्ले करण्यात आले, तर दिल्ली पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली होती. सरकारने गांधी यांच्या हत्येचा कट रचणाऱ्यांना तातडीने दोषी ठरवून तत्परतेने फासावर चढविले; मात्र शीख विरोधी हिंसाचारास जबाबदार असलेल्यांना न्यायालयासमोर आणण्यात मात्र एवढी तत्परता दाखवली गेली नाही, असेही या पत्रात त्यांनी म्हटले आहे. (वृत्तसंस्था)
१९८४ ची दंगल; ओबामांकडे मदतीची मागणी
By admin | Published: November 05, 2014 1:12 AM