ऑनलाइन लोकमत
इस्लमाबाद, दि. २९ : १९८४ मध्ये पाकिस्तान सरकारने एका आण्विक चाचणीला मंजुरी दिली असती तर पाकिस्तानातील कहुटा येथून अवघ्या पाच मिनिटांत दिल्लीला नेस्तनाबुत करता आले असते, असा गौप्यस्फोट आण्विक तंत्रज्ञानाची तस्करी केल्याचा आरोप असलेले पाकिस्तानचे माजी अणुशास्त्रज्ञ डॉ. अब्दुल कादिर खान यांनी एका कार्यक्रमात केला. अणुऊर्जेसंदर्भात शनिवारी सायंकाळी पाकिस्तानात आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. यौम-ए-तकबीर नावाचा हा कार्यक्रम होता.
१९८४ सालीच देश भारतावर अणू हल्ला करण्यास समर्थ होता. त्याची योजनाही तयार करण्यात आली होती. मात्र, तत्कालीन अध्यक्ष जनरल झिया उल हक यांनी त्याला विरोध केला. कारण त्यामुळे आंतरराष्ट्रीय मदत रोखली जाण्याची भीती होती. अफगाणिस्तानवर सोव्हिएत संघाचा कब्जा होता. त्यामुळे हे अर्थसहाय्य पाकिस्तानला मिळत होते असेही पाकिस्तानचे वादग्रस्त अणुशास्त्रज्ञ खान म्हणाले.
अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये अनेक प्रकारची जोखिम पत्करुन आपण अण्वस्त्राचा विकास केल्याचा दावा त्यांनी केला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे खान यांच्यावर अणु गुपिते विकल्याचा आरोप आहे. त्यामध्ये त्यांना नजरबंदीचाही अनुभव घ्यावा लागलेला आहे.