युक्रेनमधील २ लाख मुलांना जबरदस्तीने रशियात नेले; वोलोदिमीर जेलेन्स्की यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2022 07:51 AM2022-06-03T07:51:28+5:302022-06-03T07:51:33+5:30
युक्रेनच्या अनाथाश्रमांमधील मुलांनाही रशियाच्या लष्कराने बळजबरीने आपल्या देशात नेले आहे.
कीव्ह : युक्रेनमधील सुमारे २ लाख मुलांना जबरदस्तीने रशियामध्ये नेण्यात आले आहे, असा खळबळजनक आरोप युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की यांनी केला आहे. ही मुले संपूर्ण रशियाभर विखुरली गेली असून, त्यांचा पालकांशी, कुटुंबीयांशी काही संपर्क उरलेला नाही, असेही त्यांनी सांगितले.
जेलेन्स्की म्हणाले की, युक्रेनच्या अनाथाश्रमांमधील मुलांनाही रशियाच्या लष्कराने बळजबरीने आपल्या देशात नेले आहे. हा केवळ माणसांचे अपहरण करण्याचा मामला नाही तर युक्रेनपासून या मुलांची नाळ तोडण्याचे कारस्थान रशियाने रचले आहे. या मुलांना युक्रेनला कधीच परतता येणार नाही, अशी व्यवस्था रशियाने केल्याचा आरोपही जेलेन्स्की यांनी केला. त्यांनी एका व्हिडिओ फितीमध्ये म्हटले आहे की, मुलांना पळवून नेण्याचे कृत्य करणाऱ्यांना युक्रेन भविष्यात शिक्षा देईल. पण, सर्वप्रथम आम्ही रशियाचा रणांगणात पराभव करणार आहोत. युक्रेनची जनता कधीच शरणागती पत्करणार नाही. तसेच आमची मुले कोणाचे गुलाम बनून राहणार नाहीत हे नक्की आहे.
जेलेन्स्की म्हणाले की, युद्धात युक्रेनमधील २४३ हून अधिक मुलांचा मृत्यू झाला आहे. ४४६ मुले जखमी तर १३९ मुले बेपत्ता आहेत. रशियाच्या सैनिकांनी युक्रेनचा काही भाग ताब्यात घेतला आहे. तेथील सध्याची नेमकी परिस्थिती कशी आहे, याची युक्रेन सरकारला कल्पना नाही. त्यामुळे युद्धात ठार व जखमी झालेल्या मुलांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे. युक्रेनमध्ये युद्धात ठार झालेल्या मुलांपैकी ११ जणांची नावे जेलेन्स्की यांनी आपल्या भाषणात घेतली. या मुलांचा मृत्यू कसा झाला हे सविस्तरपणे सांगितले. (वृत्तसंस्था)