माॅस्काे/कीव्ह : रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धविरामाबाबत चर्चा सुरू असतानाच रशियाने जाेरदार हल्ले केले आहेत. युक्रेनचे महत्त्वाचे खेर्सन शहर ताब्यात घेतल्याचा दावा केला आहे. तर दुसरीकडे पूर्वेकडील डाेनेत्स्क भागात रशियाने केलेल्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राच्या हल्ल्यात २० नागरिकांचा मृत्यू झाला. रशियाने मात्र या हल्ल्याचे खापर युक्रेनवर फाेडले आहे.
डाेनेत्स्कमध्ये माेठा क्षेपणास्त्र हल्ला झाला. त्यात २० नागरिक ठार, तर ३५ जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यावरून दाेन्ही देशांनी एकमेकांवर आराेप केले आहेत. युक्रेनने हल्ल्याचा आराेप फेटाळला असून रशियानेच क्षेपणास्त्र हल्ला केल्याचे म्हटले आहे. शांततेसाठी झालेली चर्चेची चाैथी फेरीही निष्फळ ठरली. तरीही चर्चा कायम राहणार असल्याचे दाेन्ही देशांनी म्हटले आहे. त्याच वेळी युक्रेनच्या बाजूने खंबीरपणे उभे राहिलेले पाेलंड, चेक रिपब्लिक आणि स्लाेवेनियाचे पंतप्रधान युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांना भेटण्यासाठी कीव्ह येथे दाखल झाले आहेत. युराेपियन महासंघाचा युक्रेनला भक्कम पाठिंबा असल्याचा संदेश या दाैऱ्यातून देण्यात आला आहे.
आणखी एका वृत्त वाहिनीवर युद्धाला विराेध
युक्रेनवर हल्ला केल्यावरून रशियामध्येही अंतर्गत विराेध हाेत आहे. काही दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीच्या सर्व पत्रकारांनी थेट प्रक्षेपणादरम्यान राजीनामा दिल्याचे जाहीर केले हाेते. आता चॅनल वन या रशियन वृत्त वाहिनीतील निर्माती मरिना ओव्हस्यानिकाेव्हा हिने थेट प्रक्षेपणादरम्यान ‘नाे वाॅर’ असा फलक झळकावला. हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. बातमीपत्र सुरू असतानाच ती, युद्ध नकाे, युद्ध थांबवा. ते तुमच्याशी खाेटे बाेलत आहेत. प्रचारावर विश्वास ठेवू नका, असे ओरडू लागली. तिला अटक करण्यात आली आहे.
रशियाने युराेपला हाेणारा नैसर्गिक वायूचा पुरवठा राेखला आहे. यमल-युराेप पाईपलाईनद्वारे हाेणार पुरवठा बंद करुन ताे इतरत्र वळविण्यात आला आहे. या पाईपलाईनद्वारे पाेलंड आणि जर्मनीला पुरवठा हाेताे. मात्र, दाेन्ही देशांनी युक्रेनची बाजू घेतल्यामुळे रशियाने हा निर्णय घेतला आहे. पाईपलाईन बंद केल्यामुळे युराेपमध्ये नैसर्गिक वायूचे दर भडकले आहेत.