जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. अमेरिकेत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून आगामी काळात परिस्थिती आणखीनच गंभीर होण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोलच्या माहितीनुसार, अमेरिकेतील कोरोना संक्रमित रूग्णांची संख्या दोन कोटी होऊ शकते.
सेंटर फॉर डिसीज कंट्रोलने म्हटले आहे की, अमेरिकेत दोन कोटीहून अधिक लोकांना कोरोनाची लागण होऊ शकते. हा आकडा सध्याच्या 24 लाख रुग्णांपेक्षा 10 पट जास्त आहे. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेत एकाच दिवसात विक्रमी 41000 नवीन रुग्ण आढळले आहेत आणि 2430 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याआधीच्या दिवशी 37077नवे कोरोना रुग्ण आढळल्याची नोंद झाली आहे.
आतापर्यंत अमेरिकेत 124410 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. न्यूयॉर्कमध्ये 31301तर न्यू जर्सीमध्ये 14872 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अमेरिकेतील आता जवळजवळ प्रत्येक राज्यात नवीन रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कॅलिफोर्नियामधील कोरोना रूग्णांच्या संख्येने दोन लाखांचा टप्पा ओलांडला आहे. अॅरिझोना, फ्लोरिडा आणि टेक्सासमध्ये पाच हजाराहून अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत. गेल्या 14 दिवसांत या भागातील रुग्णालये 32 टक्क्यांपर्यंत कोरोना रुग्णांमुळे भरली आहेत.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता टेक्साससह अनेक राज्यांनी अनलॉकचा पुढील टप्पा पुढे ढकलला आहे. मे महिन्यात टेक्सासमध्ये रेस्टॉरंट्स आणि व्यवसायांना उघडण्याची परवानगी होती. गव्हर्नर ग्रेग अॅबॉट यांनी सांगितले की, कोरोनाचा रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन आपल्याला आणखी कठोर निर्णय घ्यावे लागतील. फ्लोरिडामध्ये गेल्या दोन दिवसांपासून 10000 पेक्षा जास्त कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.
दरम्यान, भारतातही कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे नवे 18,552 रुग्ण सापडल्याने देशभरातील आकडेवारीने तब्बल 5 लाखांचा टप्पा पार केला आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत विक्रमी वाढ पाहायला मिळालेली असताना 384 मृत्यूही नोंदविले गेले आहेत. देशात सध्या 1,97,387 रुग्ण उपचार घेत आहेत एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 5,08,953 वर गेला आहे. तर 295881 रुग्ण बरे झाले आहेत. देशात एकूण मृतांचा आकडा 15,685 झाला आहे. याच दरम्यान एक दिलासादायक माहिती समोर आली आहे.
भारतातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट म्हणजेच रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 58 टक्के झाले आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी शनिवारी (27 जून) याबाबतची माहिती दिली आहे. तसेच जवळपास तीन लाख लोकांनी कोरोनावर मात केली आहे. देशातील कोरोना रुग्णांचा मृत्यू दर हा तीन टक्के आहे. तर दुसरीकडे रुग्ण दुप्पट होण्याचं प्रमाण म्हणजेच डबलिंग रेट हा 19 दिवसांवर पोहचला आहे. लॉकडाऊनच्या आधी हे प्रमाण 3 दिवसांवर होते अशीही माहिती हर्षवर्धन यांनी दिली.
आणखी बातम्या...
"लायकी पाहून बोलावं, सूर्याकडे पाहून थुंकल्यास...", अजित पवारांची गोपीचंद पडळकरांवर सडकून टीका
'रयत'च्या अध्यक्षपदी शरद पवारांची फेरनिवड; सचिवपदी प्राचार्य विठ्ठल शिवणकर
वीजबिल दरवाढीविरोधात भाजपाचा डोंबिवलीत मोर्चा, पण फिजिकल डिस्टंसिंगचा फज्जा