लाहोर : पाकिस्तानात गेल्या २० महिन्यांत बलात्काराचे केवळ ३.३ टक्के आरोप सिद्ध झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. यातून ब्रिटिशकालीन कायद्यातील त्रुटी व अशा प्रकरणांत गुन्हा दाखल करण्यातील हयगय दिसून येते. अधिकृत आकडेवारीनुसार, जून २०१३ ते फेब्रवारी २०१५ यादरम्यान पाकिस्तानात बलात्काराचे सुमारे ४,९६० गुन्हे दाखल करण्यात आले. अशा प्रकरणांत ६,६३२ पैकी केवळ २१९ आरोपींवरीलच दोष सिद्ध झाले आहेत. सर्वाधिक लोकसंख्या असलेला पंजाब प्रांत गुन्ह्यांच्या नोंदीत सर्वोच्चस्थानी आहे. तेथे ४,३२२ गुन्ह्यांची नोंद झाली. महिला अत्याचाराची पोलिसांनी माहिती देण्याबाबत समाजाच्या आखूड मनोवृत्तीमुळे अनेक प्रकरणे पडद्याआड राहतात. ही संख्या नोंद झालेल्या गुन्ह्यांहून खूप अधिक आहे. ‘वास्तविक पाहता महिला अत्याचारांचे प्रमाण हे खूप आहे. अधिकतर पीडित महिला यासंबंधीची माहिती पोलिसांना देत नाहीत. कारण असे केल्याने आपल्या त्रासात आणखी वाढ होईल, अशी भीती त्यांना सतावत असते,’ अशी खंत साहिल या स्वयंसेवी संस्थेशी संबंधित वकील आतिफ सुल्तान यांनी व्यक्त केली. देशातील न्याय प्रणाली ही बलात्कार पीडितेला निराश करणारी असून, ती केवळ दोषींच्या फायद्याची आहे, असा दावाही त्यांनी केला. दोषींना लाभदायी या व्यवस्थेत पोलिसांपासून न्यायाधीशांपर्यंत सर्वांचा समावेश आहे.(वृत्तसंस्था)