नवी दिल्ली : ब्रिटनमधील एका दफनभूमीत एका २० वर्षीय युवकावर अंत्यसंस्कार केले जात असताना एक युवती तेथे वधूच्या पारंपरिक वेशात सजूनधजून आणि हातात पुष्पगुच्छ घेऊन दाखल झाली. प्रारंभी सारेच अचंबित झाले; पण जेव्हा सत्य समजले तेव्हा सर्वांच्याच डोळ्यांत अश्रू तरळले.
ती त्या मृत तरुणाची वाङ्दत्त वधू होती; पण दोघांचे लग्न होण्यापूर्वीच त्याचा अपघातात मृत्यू झाला होता. ती त्याला निरोप द्यायला दफनभूमीत आली होती. ब्रिटनच्या आयर्लंड प्रांतातील लायमेरिक येथील एस्केटन दफनभूमीत हा हृदयद्रावक प्रसंग घडला. त्या युवतीचे नाव केट क्विलिंगन आहे.
तिचा २० वर्षीय बॉयफ्रेंड माइल्स माइले याच्यासोबत सेंट मुंचिन चर्चमध्ये लग्न होणार होते. माइल्स लग्नासाठी आपल्या कारमधून चर्चकडे निघाला असताना, मध्येच त्याच्या कारला अपघात झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. आपल्या होणाऱ्या पतीला अंतिम निरोप देण्यासाठी ती वधूच्या वेशातच दफनभूमीत पोहोचली. हे दृश्य पाहून सर्वच हेलावले.
तू नेहमी माझ्यासोबतच आहेस-
आपल्या प्रियकरास श्रद्धांजली वाहताना केटने फेसबुकवर लिहिले की, ‘हा माझ्या आयुष्यातील सर्वांत कठीण दिवस आहे. मला विश्वास आहे की, तू नेहमीच माझ्यासोबत आहेस. मला अपेक्षा आहे की, मी काय विचार केला, हे तू नक्कीच जाणत असशील. मी तुझ्यावर नेहमीच प्रेम केले, करीत राहीन. आज भलेही अलविदा म्हणण्याची वेळ आली असेल, पण एक दिवस आपण नक्कीच भेटू.’