एक व्यक्ती रातोरात २०० कोटींची लॉटरी जिंकला, त्याच्या खात्यातही पैसे आले. परंतू त्याहून हैराण करणारी गोष्ट म्हणजे पठ्ठ्याने हे कोणालाच म्हणजे कोणालाच काही सांगितलेले नाही. एवढी मोठी गोष्ट त्याने पत्नीपासूनही लपविली. अब्जाधीश झालेल्या या व्यक्तीने यामागचे कारणही सांगितले आहे.
चीनच्या गुआंग्शी जुआंग प्रांतातील ही घटना आहे. तेथील एका व्यक्तीला २२० दशलक्ष युआन म्हणजेच दोन अब्ज रुपयांची लॉटरी लागली आहे. त्याने ४० तिकीटे खरेदी केली होती. यापैकी ७ तिकिटांवर त्याला वेगवेगळी लॉटरी लागली. पण ही गोष्ट त्याने गुप्तच ठेवली. पत्नी, मुलांना साधी भनक देखील लागू दिली नाही. चेहऱ्यावर आनंदही दाखविला नाही. पत्नी मुलांना समजले तर ते घमेंडखोर आणि आळशी बनतील, अभ्यासही करणार नाहीत याची भीती त्याला वाटत आहे. या एकाच कारणाने त्याने खात्यात अब्जावधी पडलेले असूनही घरी सांगितले नाहीत.
२४ ऑक्टोबरला त्याने बक्षीसाची रक्कम घेतली. त्यातील १५ कोटी रुपये त्याने समाजकार्यासाठी दिले आहेत. लॉटरी लागल्यावर ती देताना कंपनीवाले फोटो काढतात, तो सोशल मीडियावर, वृत्तपत्रांमध्ये छापून आणतात. या पठ्ठ्याने फोटो काढायला दिला परंतू मॉलमध्ये जसे कारटूनच्या वेशात लहान मुलांसोबत पात्र खेळते तसा ड्रेस घातला होता. लॉटरी जिंकल्याचा आनंद गगनात मावत नव्हता, परंतू तो कंट्रोल करत होता. त्याने मित्र मंडळींना देखील याबाबत अवाक्षरही सांगितलेले नाहीय.
घरच्यांना सांगायचे नाहीय, मग एवढा पैसा कुठे खर्च करणार असे विचारले असता त्याने याबाबत अद्याप विचार केलेला नाहीय. त्यासाठी काही वेळ लागेल, असे सांगितले. या व्यक्तीला ४३ दशलक्ष युआन कर भरावा लागला असून १५ कोटी वगळून १ अब्ज ९३ कोटी रुपये त्याच्या खात्यात आले आहेत.