तोक्यो : उत्तर कोरियाने सप्टेंबर महिन्यात आजवरची सर्वात शक्तिशाली व सहावी अणुचाचणी केली, त्यासाठी जमिनीखाली बांधलेला बोगदा कोसळून २०० जण ठार झाले असावेत, असे वृत्त जपानच्या एका वृत्तवाहिनीने मंगळवारी दिले.पूर्ण सेन्सॉरशिप असलेल्या उत्तर कोरियातून अधिकृत बातमी क्वचितच दिली जाते. या घटनेची प्रत्यक्ष माहिती असलेल्या अनाम सूत्रांच्या हवाल्याने ‘टीव्ही असाही’ने हे वृत्त दिले. प्युंग्गे री या ठिकाणच्या पूर्वीपासून वापरल्या गेलेल्या चाचणीस्थळावर सप्टेंबरमधील चाचणी केली होती. तेथे चाचणीसाठी बोगदा तयार केलेला होता. प्रत्यक्ष चाचणी ३ सप्टेंबरला झाली. आठवडाभराने १० सप्टेंबर रोजी बोगदा कोसळला तेव्हा सुमारे १०० कामगार ठार झाले. त्यानंतर बचावकार्य सुरू असताना पुन्हा बोगदा कोसळला. त्यामुळे मृतांचा आकडा २०० च्या घरात असू शकेल, अशी भीती या वृत्तवाहिनीने व्यक्त केली.अणुचाचणी झाली तेव्हा तेथे मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाल्याचा अंदाज तज्ज्ञांनी त्याचवेळी उपग्रहीय छायाचित्रांवरून व्यक्त केला होता. पण आता आलेली ही बातमी खरी असेल तर या अणुचाचणीने भूगर्भात किती मोठ्या प्रमाणावर उलथापालथ झाली असावी याची कल्पना येऊ शकते.
अणुचाचणीचा बोगदा कोसळून २०० ठार? भूगर्भात उलथापालथ; उत्तर कोरियात दुर्घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2017 6:38 AM