इस्रायल आणि लेबनॉनमधील दहशतवादी संघटना हिजबुल्लाह यांच्यातील संघर्ष आणखी भडकण्याची शक्यता आहे. इस्रायलने हिजबुल्लाहवर गेल्या एका आठवड्यात 2000 हून अधिक हवाई हल्ले केले असून यात आतापर्यंत सुमारे 700 जण मारले गेले आहेत. एवढेच नाही, तर आता इस्त्रायली लष्कराने आपल्या सैनिकांना सीमेवर कंबर कसून उभे ठाकण्याचा आदेश दिला आहे.
इस्रायली सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जमिनीवरील हल्ला करून हमासप्रमाणेच हिजबुल्लाहला देखील संपवण्याची तयारी सुरू आहे. असे झाल्यास, हे एक भयंकर युद्ध होईल. कारण हिजबुल्ला ही जगातील सर्वात मोठी दहशतवादी संघटना आहे. इतर कोणत्याही देशापेक्षा त्यांच्याकडे मोठे सैन्य असून एक लाख अतिरेकी लढण्यासाठी तयार आहेत.
यातच, भारताने आपल्या नागरिकांना तत्काळ लेबनॉन सोडण्यास सांगितले असून, लेबनॉनला जाण्याचा प्लॅन असणाऱ्यांना आपला प्रवास पुढे ढकलण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. इस्रायल- लेबनॉन संघर्षाकडे अमेरिका, युरोपपासून ते आशियापर्यंत सर्वांचेच लक्ष्य आहे. एकीकडे अमेरिकेने मध्यपूर्वेत अतिरिक्त सैन्य पाठवण्याची घोषणा केली आहे. तर दुसरीकडे, हिजबुल्लाहवर जमिनीवरून हल्ला झाल्यास, आम्ही त्यांना सर्व प्रकारची मदत करू, असे इराणने म्हटले आहे.
तत्पूर्वी, हिजबुल्लाहने बुधवारी इस्रायलच्या तेल अवीवला लक्ष्य केले होते. हिजबुल्लाहने इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादच्या कार्यालयाला लक्ष्य करून हवाई हल्ला केला होता. यासाठी त्यांनी बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा वापर केला होता. यानंतर आता, हिजबुल्लाचा संपूर्ण खात्मा होईपर्यंत आमचे सैन्य थांबणार नाही, असे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यानी म्हटले आहे. याच वेळी, अमेरिकेने अतिरिक्त सैन्य पाठवण्याची घोषणा केली असली तरी, इस्रायलला 'ऑल आउट वॉर' टाळण्याचा सल्लाही दिला आहे.