वॉशिंगटन - एक लघुग्रह 2046 मध्ये व्हॅलेंटाईन डेच्याच दिवशी पृथ्वीला धडकण्याची शक्यता आहे. यासंदर्भात नासाने इशाराही दिला आहे. या लघुग्रहावर नासाचे बारकाईने लक्ष असून तो मोठ्या धोक्याचे कारण बनू शकतो, असे शास्त्रज्ञांना दोन आठवड्यांपूर्वीच आढळून आले आहे. याची शक्यता कमी असली तरी, शास्त्रज्ञांनी याला आपल्या यादीत वरच्या स्थानावर ठेवले आहे. हा लघुग्रह 2023DW म्हणून ओळखला जातो. नासाने म्हटल्याप्रमाणे 26 फेब्रुवारीला पहिल्यांदा याचा शोध लागला.
CBS न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, नासाने या लघूग्रहाला धोक्याच्या यादीत टाकले आहे. या यादीत पृथ्वीला प्रभावित करू शकतील अशा काही लघूग्रहांची नावे आहेत. यात पहिल्या क्रमांकावर आता 2023DW ला ठेवण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे, सध्या याचा कसल्याही प्रकारचा धोका नाही, असे वैज्ञानिकांनी म्हटले आहे. धोक्याच्या यादीनुसार, 2047 ते 2051 पर्यंत – व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी या लघूग्रहाचा धोका आहे.
यासंदर्भात नासाने ट्विट केले आहे की, ‘आम्ही 2023 DW नावाचा एक लघूग्रह ट्रॅक करत आहोत. ज्याची 2046 मध्ये पृथ्वीला धडकण्याची शक्यता फार कमी आहे. खरे तर, जेव्ह एखाद्या नव्या गोष्टीचा पहिल्यांदाच शोध लागतो, तेव्हा अनिश्चितता कमी करण्यासाठी आणि भविष्यातील त्यांच्या कक्षेचा पुरेसा अंदाज लावण्यासाठी अनेक आठवड्यांचा डेटा लागतो.’ नासाच्या प्लॅनेटरी डिफेंस कोऑर्डिनेशन ऑफिसच्या मते, हा लघूग्रह पृथ्वीला धडकण्याची शक्यता सध्या फार कमी आहे.