वॉशिंग्टन : २०५० पर्यंत जगात सर्वाधिक मुस्लिम भारतात असतील, याबाबतीत भारत इंडोनेशियालाही मागे टाकेल. त्याचवेळी हिंदू नागरिकांची संख्याही वाढेल व हिंदू नागरिक जगात तिसऱ्या क्रमांकावर येतील, असा नव्या अभ्यासाचा निष्कर्ष आहे. प्यू संशोधन संस्थेने जागतिक लोकसंख्येचा धर्मावर आधारित अभ्यास केला असून, त्याचे हे निष्कर्ष आहेत. हिंदू व ख्रिश्चन नागरिकांची लोकसंख्या जागतिक लोकसंख्या वाढीच्या वेगाबरोबर असणार आहे; पण मुस्लिम लोकसंख्या मात्र जागतिक लोकसंख्या वाढीपेक्षा जास्त गतीने वाढणार आहे. हिंदू बहुसंख्य राहतीलच भारतात हिंदू नागरिक हे बहुसंख्य राहतील; पण मुस्लिम नागरिकांची संख्याही वाढेल व जगात सर्वाधिक मुस्लिम नागरिक राहणारा देश भारत ठरेल. यासंदर्भात भारत इंडोनेशियालाही मागे टाकेल, असे प्यू अहवाल म्हणतो. प्यू अहवालानुसार २०११ साली इंंडोनेशियात मुस्लिम लोकसंख्या २०५ दशलक्ष इतकी होती. त्यावेळी भारतात १७७ दशलक्ष मुस्लिम होते. येत्या चार दशकांत ख्रिश्चन हा सर्वांत मोठा धार्मिक गट राहील; पण इस्लामची वाढ कोणत्याही धर्मापेक्षा जास्त असेल. २०५० सालापर्यंत मुस्लिम नागरिकांची संख्या २.८ अब्ज असेल. म्हणजेच मुस्लिम लोकसंख्येत ३० टक्क्यांनी वाढ होईल. त्याचवेळी ख्रिश्चन नागरिकांची संख्या २.९ अब्ज असेल व वाढ होण्याची गती ३१ टक्के असेल. ( मानव जातीच्या इतिहासात प्रथमच) जगातिक पातळीवर ख्रिश्चन व मुस्लिम यांची संख्या जवळपास समान असेल. २०१० साली जगात मुस्लिम १.६ अब्ज होते व ख्रिश्चन २.१७ अब्ज होते. लोकसंख्या वाढीचा हाच वेग कायम राहिल्यास २०७० साली इस्लाम हा जगातील सर्वाधिक लोकप्रिय असा धर्म असेल. २०५० साली युरोपमधील लोकसंख्येच्या १० टक्के मुस्लिम असतील. बौद्ध नागरिकांची संख्या कायम बौद्ध धर्म हा जगातील एकच असा धर्म आहे की, पालन करणाऱ्या नागरिकांची संख्या वाढण्याची शक्यता नाही. बौद्ध धर्म, भारत, चीन, जपान, थायलंडमध्ये पाळला जातो. या देशातील प्रजनन दर स्थिर असल्याने या धर्माचे नागरिक वाढण्याची शक्यता नाही. (वृत्तसंस्था)