जगभरात नोकरी करून समाधानी असणाऱे खूप कमी लोक आहेत. काहींना कामचं प्रेशर, नोकरीचे दहा तास, बॉसची कटकट, कार्यालयातील वातावरण याचा कंटाळा आलेला असतो. पण पैशासाठी त्यांना नोकरी करणं हे भाग असतं. पण काही जण बिनधास्त नोकरी सोडून व्यवसायाकडे वळतात आणि ते आव्हान स्वीकारतात. अशीच एक घटना आता समोर आली आहे. एका तरुणीने वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी नोकरी सोडून निवृत्ती घेतली आहे. विशेष म्हणजे सध्या ही तरुणी असं काही करते, की त्याच्या जोरावर महिन्याला ती लाखो रुपये कमावत आहे.
21 वर्षांची लिली जारेम्बा (Lily Zaremba) विद्यापीठातील शिक्षण सोडून नोकरी करू लागली. मात्र नोकरीत 10 तास काम करावं लागत असल्याने ती याला देखील कंटाळली आणि तिने नोकरी सोडून देण्याचा निर्णय घेतला. लिलीने कमी वयात नोकरी सोडली असली तरी आता ती वर्षाला 53 लाखांपेक्षा अधिक कमावते. 19 वर्षांची लिली एका सुशी रेस्टॉरंटमध्ये नोकरी करू लागली. तिथं तिला 10 तास काम करावं लागत असे. साफसफाईचं कामही ती करत असे. याचदरम्यान एक फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट कंपनी (Financial Investment Company) बचतीविषयी आणि पैशांच्या योग्य नियोजनाविषयी प्रशिक्षण देत असल्याची माहिती तिला मिळाली.
आता काहीही न करता कमावतेय तब्बल 53 लाख
कंपनीकडून प्रशिक्षण घेतल्यानंतर लिलीने नोकरी सोडली. त्यानंतर दोन वर्षं कठोर मेहनत करून तिने पैशांची गुंतवणूक (Investment) सुरू केली. या काळात तिला नुकसान सोसावं लागलं. परंतु नंतर अधिक फायदा देखील झाला. `द सन`ने दिलेल्या वृत्तानुसार, नुकताच लिलीनं एक व्हिडिओ शेअर केला. यात तिनं नोकरी सोडल्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स, स्टॉक्स आणि क्रिप्टो मार्केटमध्ये गुंतवणूक सुरू केल्याचं सांगितलं आहे. याशिवाय तिने अनेकांना गुंतवणुकीविषयी माहिती देऊन चांगली कमाई केली. आता तिचं उत्पन्न चांगलंच वाढलं आहे. आता ती फक्त कमिशनवर मस्त आयुष्य जगत आहे. तसंच ती लोकांना गुंतवणुकीचा सल्लाही देत आहे.
भरपूर उत्पन्न मिळावं यासाठी लिली लोकांना देते 3 टिप्स
भरपूर उत्पन्न मिळावं यासाठी लिली लोकांना 3 टिप्स देते. प्रत्येकानं स्वतःच्या योग्यतेनुसार नोकरी शोधली पाहिजे. तुम्ही सर्वात मेहनती कर्मचारी असाल, तरी नोकरी योग्य पद्धतीची नसेल, तर तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही साध्य करू शकत नाही. दुसरी गोष्ट, अशी की प्रत्येकाने आपल्या आयुष्यात एखादा चांगला सल्लागार शोधणं आवश्यक आहे. तुम्हाला एखादी गोष्ट करायची असेल किंवा तुम्ही एखादी गोष्ट करत असाल तर ती गोष्ट अधिक चांगल्या पद्धतीने करणाऱ्या व्यक्तीला तुम्ही फॉलो करावं आणि त्याच्याप्रमाणे मेहनत सुरू करावी. यामुळे तुम्ही लवकर यश संपादन करू शकाल. ऑनलाईन इन्कमचं (Online Income) साधन शोधावं. फॉरेक्स, क्रिप्टो, अॅफिलिएट मार्केटमध्ये गुंतवणूक सुरू केली तर तुम्ही लवकर अपेक्षित कमाई करू शकाल असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.