कधी कधी माणूस फुकटाच्या हव्यासापोटी असं काही करतो, जे त्याच्या जीवावर बेततं. असाच प्रकार पोलंडमध्ये घडला आहे, जिथे एका ब्रिटीश तरुणानं ९० मिनिटांत २२ पेग रिचवले. यानंतर क्लबमध्येच त्याचा मृत्यू झाला. ३६ वर्षीय या व्यक्तीचं नाव मार्क सी असं आहे. तो त्याच्या मित्रांसह क्लबमध्ये पोहोचला तेव्हा तो दारूच्या नशेत होता, असे यूके डेली मेट्रोच्या वृत्तात म्हटलंय. क्लबच्या कर्मचाऱ्यांनी त्याला फ्री एन्ट्रीचं आमिष दाखवल्याचंही म्हटलं जातंय.
तपासकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार मार्कनं नकार देऊनही क्लबच्या कर्मचाऱ्यांनी त्याला वारंवार ड्रिंक्स ऑफर केले आणि जबरदस्तीनं दारू प्यायला दिली. सुमारे दोन डझन जड पेग घेतल्यानंतर तो अचानक कोसळला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर क्लबच्या कर्मचाऱ्यांनी त्याच्याकडून २,२०० पोलिश झ्लॉटी (₹४२,८१६) रोख रक्कम लुटली. अहवालात असंही म्हटलंय की मार्कच्या मृत्यूच्या वेळी त्याच्या रक्तात कमीत कमी ०.४ टक्के अल्कोहोल होतं. रक्तातील अल्कोहोलची ही पातळी घातक मानली जाते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार या घटनेनंतर, पोलंड पोलिसांनी अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी विविध नाईट क्लबमध्ये छापे टाकले आहेत आणि आतापर्यंत ५८ लोकांना अटक केली आहे. पोलंडच्या तपास संस्थेच्या म्हणण्यानुसार, हे क्लब ग्राहकांना दारू पाजून त्यांच्याकडून पैसे चोरण्याचे रॅकेट चालवतात.