मुंबई, दि. 5 - म्यानमारमध्ये लोकशाहीवादी सरकार यावे तसेच लष्करशाही नष्ट व्हावी यासाठी आयुष्य वेचणाऱ्या आंग सान सू ची यांचे भारताशी विशेष नाते आहे. भारतामध्येच त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. नवी दिल्लीमधील लेडी श्रीराम महाविद्यालयात त्यांनी राज्यशास्त्राचे धडे घेतले. मध्यंतरी भारताच्या भेटीवर आल्या असताना त्यांनी पुन्हा एकदा लेडी श्रीराम महाविद्यालयाला भेट देऊन दिल्लीतल्या आठवणींना उजाळा दिला होता.
आंग सान सू ची यांची आई डॉ खिन ची या म्यानमार सरकारकडून भारत आणि नेपाळसाठी राजदूत म्हणून नेमल्या गेल्या होत्या. राजधानी नवी दिल्लीमध्ये 24 अकबर रोड या बंगल्यामध्ये त्यांना राहायला मिळाले होते. पं. जवाहरलाल नेहरु या बंगल्याला बर्मा हाऊस असे म्हणत. सर एडविन ल्युटेन्स यांनी बांधलेला हा भारतीय आणि पाश्चिमात्य वास्तूशैलीचा संगम असणारा हा बंगला 15 वर्षांच्या सू ची यांना विशेष आवडला होता. दिल्लीमध्येच त्यांनी कॉन्व्हेंट ऑफ जिझस अॅंड मेरी येथे शालेय शिक्षण पूर्ण केले तर लेडी श्रीराम महाविद्यालयात राज्यशास्राचा अभ्यासक्रम पूर्ण केला. तत्कालीन पंतप्रधानांचे नातू राजीव आणि संजय गांधी यांच्याशी त्यांची मैत्री होती. त्यांच्याबरोबर राष्ट्रपती भवनाजवळ त्या घोडेस्वारीही शिकल्या. या सर्व आठवणींबद्दल त्यांनी द परफेक्ट होस्टेज या पुस्तकामध्ये लिहून ठेवले आहे.
आंग सान सू ची यांनी आपण याच घरात पियानो वाजवायला शिकलो असेही या पुस्तकात नमूद केले आहे. आज या बंगल्यामध्ये कॉंग्रेस पक्षाचे मुख्यालय आहे. 1978 साली इंदिरा गांधी यांनी येथे पक्षाचे मुख्यालय सुरु केले. गेली चाळीस वर्षे याच बंगल्यातून भारतातील सर्वात जुना पक्ष चालवला गेला. आंग सान सू ची यांना जी खोली देण्यात आली होती, त्याच खोलीमध्ये पक्षाच्या सरचिटणीस पदावरती असताना राहुल गांधी यांचे कार्यालय होते. अशा प्रकारे आंग सान सू ची यांचे या घराशी अतूट संबंध आहेत. भारतामध्ये त्यांनी लोकशाहीसाठी केलेल्या कार्याचे नेहमीच कौतुक केले जाते. आंग सान सू ची यांना जवाहरलाल नेहरु अॅवॉर्ड आणि भगवान महावीर पीस अॅवॉर्डने भारतात सन्मान करण्यात आला आहे.