ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. २२ - पाकिस्तानमधील दक्षिणेकडील सिंध प्रातांत विषारी दारु प्राशन केल्यामुळे सहा महिलांसह २४ हिंदु नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
सिंध प्रातांतील हैदराबाद जिल्ह्यात बहुतांश अल्पसंख्याक हिंदु समुदायाचे नागरिक असून येथील तांडो मोहम्मद खान परिसरात काल होळी साजरी करण्यात आली, यावेळी येथील नागरिकांनी एका किरकोळ विक्रेत्याकडून दारु विकत घेतली होती. ही दारु प्राशन केल्यामुळे ३५ नागरिकांना त्रास जाणवू लागल्यानंतर त्यांना काल रात्री तांडो मोहम्मद खान येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यातील सहा महिलांसह २४ जणांचा मृ्त्यू झाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी हक नवाझ यांनी दिली.
दरम्यान, याप्रकरणी येथील रहिवाशींनी अवैध दारु विक्री करणा-यांवर कारवाई करण्याची मागणी करत आंदोलन केले होते. तसेच याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
पाकिस्तानमधील हैदराबाद आणि कराची मध्ये २०१४ साली इद-उल-अझा साजरा करण्यात आला होता. त्यावेळीही गावठी दारुमुळे २९ लोकांचा मृत्यू झाला होता.