काबुल : अफगाणिस्तानमध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी शक्तीशाली बॉम्बस्फोट घडविण्यात आले असून अमेरिकेचा दुतावास आठवड्याभरात दुसऱ्यांदा लक्ष्य करण्यात आला आहे. परवान शहरामध्ये सकाळी झालेल्या पहिल्या बॉम्बस्फोटात 8 जण ठार झाले आहेत.
परवान शहरात अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी यांच्या निवडणूक रॅलीवर पहिला बॉम्बहल्ला करण्यात आला. यामध्ये 8 जण ठार तर 30 जण गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये महिला आणि मुलांची संख्या जास्त आहे. टोलो न्यूजने याची माहिती दिली आहे. गनीच्या जवळच्या व्यक्तीने सांगितले की, राष्ट्रपती सुखरुप आहेत. या स्फोटांची अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने जबाबदारी घेतलेली नाही. मात्र, या स्फोटामागे तालिबानचा हात असल्याचा संशय व्यक्त होत आहे. परवानमधील हल्ला हा आत्मघाती होता. हल्लेखोर मोटारसायकलवरून आला होता, असे गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले.
या हल्ल्यातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. स्फोटाची तिव्रता वाढविण्यासाठी गनी यांच्या रॅलीमध्ये स्फोट घडविण्यात आला. 28 सप्टेंबरला निवडणूक होत असून तालिबान ही निवडणूक न होऊ देण्याचे प्रयत्न करत आहे. यामुळे त्यांनी गनी यांच्या रॅलीला लक्ष्य केले आहे. या आधी दोनवेळा निवडणूक टाळण्यात आली आहे.
यानंतर तालिबानने अमेरिकी दुतावासाबाहेर दुसरा बॉम्बस्फोट घडविला आहे. 9/11 च्या हल्ल्याला 18 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात हल्ला करण्यात आला होता.