जिनिव्हा : भारतात गेल्या वर्षी एप्रिल ते जूूनमध्ये डेल्टा विषाणूमुळे आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये २ लाख ४० हजार रुग्णांचा मृत्यू झाला, तसेच अर्थव्यवस्थेची घडी विस्कटली होती. तशीच परिस्थिती नजीकच्या काळात भारतात पुन्हा निर्माण होण्याची शक्यता आहे असा इशारा संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालात देण्यात आला आहे.
युनायटेड नेशन्स वर्ल्ड इकॉनॉमी अँड प्रॉस्पेक्टस् (डब्ल्यूइएसपी) या संस्थेचा अहवाल गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आला. त्यात म्हटले आहे की, ‘ओमायक्राॅन’च्या संसर्गाचा वेग मोठा असून, त्यामुळे कोरोनाच्या नव्या लाटा निर्माण होऊ शकतात. भारतामध्ये डेल्टा विषाणूच्या संसर्गामुळे जे प्रचंड नुकसान झाले त्याची पुनरावृत्ती पुन्हा होऊ शकते. ते लक्षात घेऊन भारत सरकारने ठोस उपाययोजना केल्या पाहिजेत.
आशियाई देशांत लसीकरणाचे कमी प्रमाण
आशियामध्ये अनेक देशांत लसीकरणाचे कमी प्रमाण आहे. गेल्या डिसेंबरमध्ये बांगलादेश, नेपाळ, पाकिस्तानमध्ये त्यांच्या लोकसंख्येपैकी २६ टक्क्यांहून कमी लोकांना लस देण्यात आली होती, तर भूतान, मालदीव, श्रीलंकेमध्ये लस देण्याचे प्रमाण ६४ टक्क्यांहून अधिक होते.