रोम : इटलीमध्ये कोरोना व्हायरसची लागण झाल्याने शुक्रवारी तब्बल 250 जणांचा मृत्यू झाला आहे. अधिकृत आकडेवारीनुसार इटलीमध्ये यामुळे एकाच दिवसांत मुत्यूमुखी पडणाऱ्यांची ही सर्वाधिक संख्या आहे. यामुळे येथील मृतांचा आकडा आता 1 हजार 266 वर गेला आहे. याच बरोबर येथे कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या आता 17 हजार 660 झाली आहे.
फ्रांन्समध्ये मृतांचा आकडा 79 वर -
या शिवाय फ्रान्सचे आरोग्यमंत्री ओलिवर वेरन यांनी शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार, फ्रान्समध्ये गेल्या 24 तासांत कोरोना व्हायरसमुळे 18 जणांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांची संख्या 79 वर पोहोचली आहे. तर लंडनमधील एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे लंडन मॅरेथॉनला चार ऑक्टोबरपर्यंत स्थगिती दिली आहे. एवढेच नाही, तर इंग्लंडमध्ये एका दिवसात तब्बल 200 जणांना कोरोनाची लागण झाल्याचेही आढळून आले आहे.
चीनमध्ये या साथीमुळे शुक्रवारी आणखी सात जण मरण पावले आहेत. त्यामुळे आता चीनमध्ये कोरोना बळींची संख्या ३ हजार १७६ वर पोहोचली आहे.
चीनमधून पसरायला सुरुवात झालेल्या कोरोनाने आता वैश्विक महामारीचे स्वरूप धारण केले आहे. यामुळे जगभरात 5 हजार हून अधिक जणांचा बळी गेला आहेत. तर 1 लाख 34 हजार 300 जणांना याची लागण झाली आहे. दिवसेंदिवस कोरोना संक्रमित लोकांच्या संख्येत वाढ होत आहे. यामुळे दिवसें-दिवस रुग्णालयांतील रुग्ण संख्येत वाढ होत आहे. अनेक ठिकाणी शाळा, महाविद्यालये, कार्यालये तसेच गर्दीची ठिकाणे बंद करण्यात येत आहेत. अनेक ठिकाणी दैनंदिन आर्थिक व्यवहारांवरही याचा मोठा परिणाम झाला आहे.
कोरोनाची साथ आणखी फैलावण्याचा धोका लक्षात घेऊन अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरामध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.
चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने म्हटले आहे, की चीनमध्ये कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या आता ८० हजार ८१३ वर पोहोचली आहे. त्या देशात कोरोनाचा पहिला रुग्ण हुबेई प्रांतामध्ये गत वर्षी १७ नोव्हेंबरला आढळून आला होता. हा रुग्ण ५५ वर्षे वयाचा आहे.