ऑनलाइन लोकमत
बोगोटा, दि. 2 - दक्षिण अमेरिकेतील कोलंबियामध्ये मुसळधार पावसाचा प्रकोप सुरू असून, पावसामुळे झालेल्या भूस्खलन होऊन 250 हून अधिक जणांचा बळी गेला आहे. तर शेकडो जण जखमी झाले आहेत.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी मोकोआमध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलन होऊन सगळी घरे उद्ध्वस्त झाली आहेत. वृक्ष उन्मळून पडले आहेत. तर रस्ते आणि वाहने वाहून गेली आहेत. कोलंबियाचे राष्ट्रपती जुआन मेन्युएन सांटोस यांनी मोकोआचा दौरा करून परिस्थितीचा आढावा घेतला आहे. घनदाट जंगलांनी वेढलेल्या या भागात बचाव आणि मदतकार्य वेगाने करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
कोलंबियाचे राष्ट्रपती जुआन यांनी सांगितले की, "मला आतापर्यंत 112 जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाल्याची माहिती मिलाली आहे. मात्र घटनास्थळी किती नागरिक होते याबाबतची माहिती मिळालेली नाही.," दरम्यान, रेडक्रॉसच्या मदत पथकाच्या एका अधिकाऱ्याने या दुर्घटनेत 92 जणांचा मृत्यू आणि 182 जण जखमी झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला होता. तसेच त्याने दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली होती.
तर पुतुयामो राज्याचे गव्हर्नर सोर्रेल अरोका यांनी ही मोठी आपत्ती असून, दुर्घटनेत एक पूर्ण परिसर उद्ध्वस्त झाल्याचे सांगितले. तसेच दुर्घटनेनंतर शेकडो कुटुंबे बेपत्ता असल्याची माहिती दिली. कोलंबियात मुसळधार पाऊस सुरू असून, त्यामुळे तेथे पुरस्थिती निर्माण झाली.