इस्लामाबाद : महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईवर हल्ला करून अनेक निरपराध नागरिकांचा जीव घेणाऱ्या लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेतील साजिद मीर या दहशतवाद्यावर विषप्रयोग झाल्याची माहिती समोर येत आहे. विषप्रयोगानंतर साजित मीरची प्रकृती नाजूक असून सध्या तो व्हेंटिलेटरवर असल्याचे समजते. साजित मीर हा २६/११ च्या हल्ल्याचा मास्टरमाइंड आहे. त्याच्यावर विषप्रयोग झाल्याचं सांगितलं जात असलं तरी भारताकडे होणारे त्याचे प्रत्यार्पण थांबवण्यासाठी पाकनेच विषप्रयोगाचं नाटक रचल्याची शंका भारतीय तपास यंत्रणांना आहे.
साजिद मीर याला पाकिस्तानातील डेरा गाजी खानच्या मध्यवर्ती तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. तिथंच त्याच्यावर विषप्रयोग झाल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र याबाबत पाकिस्तानकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. प्रकृती बिघडल्यानंतर मीर याला एअरलिफ्ट करून बहावलपूर येथील सीएमएच इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या रुग्णालयात भरती करण्यात आलं.
मुंबई हल्ल्यानंतर बदललं होतं रूप
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर साजिद मीर याने आपला चेहरा बदलल्याचा दावा एफबीआयकडून करण्यात आला होता. आधी अनेकदा आपल्या नावात बदल करणाऱ्या मीर याने नंतर ओळख पटू नये यासाठी प्लास्टिक सर्जरी करून रूप बदल्याची चर्चा होती.
कोण आहे साजिद मीर?
साजिद मीर हा २००१ पासून लष्कर ए तोयबाचा सक्रिय सदस्य आहे. २००६ ते ११ या काळात तो लष्करच्या बाहेरील मोहिमांचा प्रभारी होता. मुंबईत झालेल्या हल्ल्याप्रकरणी एप्रिल २०११ मध्ये मीर याला अमेरिकेत आरोपी ठरवण्यात आले होते. मीर याला जागतिक दहशतवादी घोषित करण्यासाठी काही महिन्यांपूर्वी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत अमेरिकेने प्रस्ताव सादर केला होता. भारत हा या प्रस्तावचा सहसूचक होता. मात्र या प्रस्तावात चीनने मोडता घातला. या प्रस्तावावर चीनने व्हिटो वापरला होता.